छत्रपती संभाजीनगर ८ : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या (१७ सप्टेंबर) आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, असे जरांगे म्हणाले.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, “तुम्ही व्यासपीठावर सांगितले होते की, हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. त्यामुळे आता १७ सप्टेंबरपूर्वी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.”
‘मराठ्यांनी जिंकलेली लढाई अनेकांना पचत नाही’
जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असे म्हटल्यावर अर्धा महाराष्ट्र ‘वेडा’ झाला आहे. विरोधकांना झोप लागत नाही. आम्ही गरिबांच्या पोरांसाठी जीआर काढला, तेव्हा काही अभ्यासकही ‘वेडे’ झाले.” ते पुढे म्हणाले, “एकदा मराठे आरक्षणात गेले की आपण मोठा आनंद साजरा करू. मराठ्यांनी मुंबईत जाऊन मोठी लढाई जिंकली आहे, पण हा विजय अनेकांना पचत नाही.”
‘दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करू’
जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. “१७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर दसरा मेळाव्याला आम्ही सरकारविरोधात मोठी भूमिका जाहीर करू,” असे ते म्हणाले. नारायण गडावर दसरा मेळावा होणार असून, तिथे मराठ्यांचा अपमान होणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जीआरमध्ये बदल केल्यास मुळावर उठू’
जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला. “जर आमच्या जीआरमध्ये येवल्यावाल्याचे (छगन भुजबळ) ऐकून काही शब्द बदलले, तर आम्ही १९९४ च्या जीआरलाही आव्हान देऊ आणि न्यायालयाला तो रद्द करावा लागेल. आम्ही तुमच्या मुळावर उठू. आम्ही खूप संयम पाळला आहे, आता खूप झाले,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.




