कामठी :– राज्यातील नगर परिषदांमधील नगरसेवकांना महानगरपालिकेतील नगरसेवकांप्रमाणे मासिक मानधन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नगर परिषद कामठीचे नगरसेवक तथा नगर विकास आघाडीचे गटनेते लालसिंग सोनिलाल यादव यांनी महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कामठी नगर परिषदचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिकांमधील नगरसेवकांना त्यांच्या सार्वजनिक जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने शासनाकडून मासिक मानधन दिले जाते. मात्र राज्यातील नगर परिषदांतील नगरसेवकांना अद्याप असे कोणतेही मानधन मिळत नाही. सध्या केवळ सर्वसाधारण सभा किंवा समितीच्या बैठकीस उपस्थित राहिल्यास प्रति बैठक ३०० रुपये इतका बैठक भत्ता मिळतो, जो नगरसेवकांच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविणे, विविध शासकीय कार्यालयांशी समन्वय साधणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यासाठी अनेकदा स्वतःच्या आर्थिक साधनांचा वापर करावा लागतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिका आणि नगर परिषदांतील लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या सारख्याच असल्याने दोन्ही स्तरांतील नगरसेवकांच्या मानधनातील तफावत दूर करून राज्यातील सर्व नगर परिषद नगरसेवकांना योग्य त्या दराने मासिक मानधन मंजूर करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अशी मागणी लालसिंग यादव यांनी केली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्यातील सर्व नगर परिषदांतील नगरसेवकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.याप्रसंगी कामठी नगर परिषद गटनेता व सार्वजनिक बांधकाम सभापती लालसिंग यादव, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक नीरज यादव, नियाज कुरेशी, दिलीप बांडेबूचे, आसीफ सरमतीया, योगेश गायधने, अभिषेक चिमणकर माजी नगरसेवक विकास रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.




