– बंदी असूनही तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री
संदीप कांबळे, कामठी :- राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि खर्रा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होत असून मागील महिन्यात 12 जून ला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कामठी तालुक्यातीलआवंढी येथील अरिहंत कोल्ड स्टोरेज सुपारी च्या गोदामावर धाड घालून 1 कोटी 11 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गोदामाला सीलबंद करण्यात आले होते त्यानंतर कामठी तालुक्यातील सुगंधित खर्रा विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते परिणामी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या कारर्वाईचा चांगलाच धक्का बसला ज्यामुळे बरेच दिवस खर्रा विक्रेते भूमिगत होत छुप्या पद्ध्तीने खर्रा विक्री करीत होते तर काही विक्रेते ठवकर चा खर्रा विक्रीच्या नावाखाली दुकान मांडून बसले असले तरी कामठी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी हे सुगंधित खर्रा पदार्थ अजूनही सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी, बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही पानटपऱ्या, किरकोळ दुकाने तसेच घरगुती पद्धतीने तयार करण्यात येणारा खर्राही खुलेआम विकला जात आहे. सकाळच्या वेळेतच या पदार्थांचा पुरवठा होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तसेच कामठी शहरातील जयभीम चौक,गोयल टॉकीज चौक, दुर्गा चौक, हरदास नगर, गोल बाजार चौक, फेरूमल चौक शुक्रवारी बाजार चौक ,बस स्टँड चौक, कुंभारे कॉलोनी ,छत्रपती नगर, यशोधरा नगर,मदन चौक, मच्छिपुल ,खलाशी लाईन आदी ठिकाणी सुगंधित खर्रा विकण्यात येत आहे.,वास्त विकता सुगंधित खर्र्यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असून आरोग्यास हानिकारक असल्याने राज्यात सुगँधीत तंबाकु वर प्रतिबंध घातले आहे.मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाच्या डोळे झाक पणामुळे सुगधीत तंबाकू खर्रा विक्री पूर्ववत पद्धतीने सुरू आहे. कामठी तालुक्यातील नागरिकांचे मत आहे की, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीचा शोध घेऊन मोठ्या पुरवठादारांवर कठोर कारवाई केल्याशिवाय या अवैध व्यवसायाला आळा बसणार नाही.
विशेषतःशहर तसेच ग्रामीण भागात तपासणीचे प्रमाण वाढविणे, आठवडी बाजार, बसस्थानके, शाळांच्या परिसरातील दुकाने, पानटपऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक धाडी टाकणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे कठोर व सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता ठोस आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.




