spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भाच्या कलाक्षेत्राचा गौरव; चेतन घनमारे यांना राज्यस्तरीय पारितोषिक

हंसराज मानेगांव (बाजार) :- विदर्भातील कला क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी घटना नुकतीच घडली आहे. दि. २३ व २४ मे रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय एकांकिका स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकुंज नाट्य मंडळाच्या ज्येष्ठ कलावंत चेतन घनमारे यांना उत्तेजनार्थ राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, विदर्भातून मिळालेल्या दोन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार चेतन घनमारे यांना मिळाल्याने मानेगांव बाजार परिसरासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन घनमारे हे केवळ रंगभूमीवरील कलाकार नसून उद्योग क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मानेगांव बाजार येथील प्रसिद्ध “माऊली राईस मिल”चे ते मालक असून, भंडारा जिल्ह्यात त्यांच्या पाच सोनालिका ट्रॅक्टर एजन्सी यशस्वीपणे कार्यरत आहेत. व्यवसायातील मोठी जबाबदारी सांभाळत असतानाच कला आणि अभिनयाची आवड जपणे ही बाब विशेष कौतुकास्पद मानली जात आहे.

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात अनेकजण व्यवसाय किंवा नोकरीपुरतेच मर्यादित राहतात. मात्र चेतन घनमारे यांनी उद्योजकतेसोबत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवत कला जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि रंगभूमीवरील प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी त्यांची विशेष दखल घेत राज्यस्तरीय पारितोषिकाने गौरव केला.

कलाकुंज नाट्य मंडळानेही गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील सांस्कृतिक परंपरा जपत विविध सामाजिक विषयांवर आधारित एकांकिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत मंडळाच्या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय, नेपथ्य आणि दिग्दर्शनाच्या जोरावर प्रभावी सादरीकरण केले. त्यामध्ये चेतन घनमारे यांच्या भूमिकेने विशेष लक्ष वेधून घेतले.

चेतन घनमारे यांच्या या यशाबद्दल परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, कला रसिक तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “उद्योग आणि कला यांचा सुंदर संगम साधणारा कलाकार” अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुण कलाकारांनाही प्रेरणा मिळत आहे.

“हा सन्मान फक्त माझा नसून कलाकुंज नाट्य मंडळाच्या सर्व सदस्यांच्या मेहनतीचं फळ आहे. श्रीकांत तुमसरे यांनी दिलेल्या संधीमुळे मला हे व्यासपीठ मिळालं. कलाकार, सहकारी आणि परिवाराच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळालं,” अशी भावना चेतन घनमारे यांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.