spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आक्रमक आंदोलनापुढे सरकार झुकले; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे निलंबन अखेर मागे

– ‘अखेर सत्याचा विजय’ : नियम ३७४ अंतर्गत झालेली कारवाई लोकसभा सचिवालयाकडून रद्द

हंसराज,प्रतिनिधी नवी दिल्ली / भंडारा :- लोकसभा अधिवेशनादरम्यान मागील दीड महिन्यांपासून निलंबित करण्यात आलेले भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे आक्रमक खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने नियम ३७४ अंतर्गत केलेली ही कारवाई तत्काळ प्रभावाने रद्द केली असून, तसे अधिकृत पत्र जारी केले आहे. या निर्णयामुळे डॉ. पडोळे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, “हा केवळ एका खासदाराचा नाही, तर जनतेच्या आवाजाचा विजय आहे,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत ३ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. प्रशांत पडोळे यांना सभागृहाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र, या कारवाईमुळे खचून न जाता डॉ. पडोळे यांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून आपले आंदोलन सुरूच ठेवले. दररोज सकाळी संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी ते हातात फलक घेऊन बसत आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेत.

निलंबनाच्या काळात डॉ. पडोळे यांनी शेतकरी प्रश्न, वाढती बेरोजगारी, ओबीसी जनगणना आणि आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर रान उठवले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे सोशल मीडिया आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये सरकारवर टीकेची झोड उठली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते, दररोज चालणाऱ्या या आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकशाही मूल्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. हा वाढता दबाव पाहता अखेर लोकसभा सचिवालयाला निलंबन मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लोकसभा सचिवालयाचे संचालक अजय कुमार सूद यांच्या स्वाक्षरीने १७ मार्च २०२६ रोजी विशेष आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार डॉ. पडोळे यांचे निलंबन आजपासूनच रद्द करण्यात आले असून, ते पुन्हा सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.

निलंबन मागे घेतल्याची बातमी समजताच डॉ. पडोळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “हे निलंबन माझ्यावर नव्हे, तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आवाजावर होते. भंडारा-गोंदियातील जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाच्या बळावरच मी ही लढाई लढू शकलो. सत्याचा विजय झाला आहे. आता पुन्हा सभागृहात जाऊन जनतेचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडणार आहे.”

डॉ. पडोळे यांचे निलंबन मागे घेतल्याचे वृत्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पोहोचताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला. “आता लोकसभेत पुन्हा एकदा वाघाची गर्जना ऐकायला मिळेल,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका समर्थकाने दिली. आगामी अधिवेशनात डॉ. पडोळे कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Popular Articles