– खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन;
– ‘आयटक’च्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचा एल्गार
हंसराज भंडारा :- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत, सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी भंडारा जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धडक दिली. जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महाधरणे आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसर कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनादरम्यान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. “ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामीण प्रशासनाचा कणा आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांबाबत मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करेन आणि या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन खासदार डॉ. पडोळे यांनी यावेळी दिले.
प्रमुख मागण्या:
आंदोलकर्त्यांनी अभय यावलकर समितीच्या शिफारसी लागू करणे, उत्पन्नाची अट रद्द करून सरसकट १०० टक्के अनुदान देणे, १० टक्के आरक्षणांतर्गत व अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती सुरू करणे अशा शासन स्तरावरील मागण्या मांडल्या. तसेच जिल्हा स्तरावर एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे थकीत वेतन अदा करणे, दरमहा राहणीमान भत्ता वेतनासोबत देणे, शिपाई कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्ड लिहून घेण्याची पद्धत बंद करणे आणि कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक अद्यावत करणे या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कॉ. माधवराव बांते यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कॉ. संतोष शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. शिवकुमार गणविर, जिल्हा सहसचिव कॉ. जयशंकर राऊत, जिल्हा सचिव कॉ. जयप्रकाश मेहर, प्रसिद्धीप्रमुख कॉ. कृष्णाकुमार उहाले, जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. गजानन लाडसे आणि जिल्हा सचिव (आयटक) कॉ. हिवराज उके यांनी केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य कॉ. गौरीशंकर धुम्मनखेडे, कॉ. रामजी मेश्राम, कॉ. भुमेश्वर येळणे, कॉ. ओमप्रकाश मुळे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी बंधू-भगिनी आपल्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.