– खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा – रवींद्र मनोहरे
नागपूर :- सिरकॉट, अमरावती रोड, नागपूर येथे 27 मार्च रोजी “स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन” अंतर्गत भव्य किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अरविंद वाघमारे, डायरेक्टर (DOCD), नागपूर व कृषी मंत्रालय, यांची उपस्थिती होती. याशिवाय रवींद्र मनोहरे (DSAO), नागपूर, डॉ.के.पांडीयन (वरिष्ठ शास्त्रज्ञ, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. मुख्तार शेख (वरिष्ठ शास्त्रज्ञ,, GTC, CIRCOT, नागपूर), डॉ. समीर वड्याळकर (अंकुर सीड्स, नागपूर), गोविंद वैराळे (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, CITI CDRA, महाराष्ट्र) व संजय सत्यकार (डायरेक्टर, जीविका कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात गोविंद वैराळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत एचडीपीएस (High Density Planting System) कापूस तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन व उत्पन्न कसे मिळू शकते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. समीर वड्याळकर यांनी दर्जेदार बियाण्यांची निवड, रोपांची संख्या व अंतर, खत व्यवस्थापन, कीडनाशक फवारणी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. मुख्तार शेख यांनी कापूस जिनिंगचे महत्त्व, कापसातील आर्द्रता (मॉइश्चर), दर्जा व कंटॅमिनेशन याबाबत माहिती देत मॉइश्चर मीटरच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. प्रगतिशील शेतकरी संजय सत्येकार यांनी एचडीपीएस तंत्रज्ञानाचा स्वतःचा अनुभव शेअर करत 2025-26 हंगामात प्रति एकर 22 किंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. ही पद्धत पारंपरिक शेतीतही फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. डॉ. के.पांडीयन, यांनी कमी होत चाललेल्या शेती क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन घेण्याची गरज व्यक्त केली. एचडीपीएस तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच “कस्तुरी भारत कापूस” या ब्रेडद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाचे मूल्य वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सेंद्रिय कर्ब वाढविणे, सूक्ष्मजीवांची संख्या वाढविणे आणि कापसाच्या अवशेषांचा बायोचार किंवा ब्रिकेटसाठी उपयोग करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रगतिशील शेतकरी व कॉटन एक्स्टेंशन व्हॉलेंटियर्स यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये महादेव गावंडे, पारशिवनी (18 किंटल/एकर), उमेश वाघमारे, काटोल (14.5 किंटल/एकर), सचिन ठाकरे, नरखेड (13) किंटल/ एकर), संदीप ढगे, भिवापूर (13 किंटल/ एकर) व विनोद शिंदे, नागपूर ग्रामीण (14 किंटल / एकर) या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल गौरव करण्यात आला. रवींद्र मनोहरे, यांनी एचडीपीएस पद्धतीचे फायदे, लांब धाग्याचा कापूस, स्मार्ट कापूस उत्पादन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, खताच्या टंचाइला पर्याय म्हणून कृषी अवषेशाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. डॉ.अरविंद वाघमारे, यांनी भारतातील कापूस उत्पादन जागतिक तुलनेत कमी असल्याचे सांगत ते वाढविण्याची गरज अधोरेखित केली. एचडीपीएस तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते व त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंतर कमी करता येईल, असे त्यांनी नमूद केले. आगामी 2026 -27 साठी नवीन कृषी धरणे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिनिंग प्रक्रियेपासून ब्रिकेट निर्मितीपर्यंत विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग घेतला, तसेच CITI CDRA चे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युगांतर मेश्राम (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA, नागपूर) यांनी केले आणि संचालन व समारोप जगदीश नेरलवार (प्रकल्प अधिकारी, CITI CDRA), यांनी आभार प्रदर्शनाने केला.








