– बालगोपालांच्या उत्साहाने परिसरात रंगले पारंपरिक वातावरण; विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिके
नागपूर :- महाकाली नगर- १ येथे पारंपरिक तान्हा पोळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील बालगोपालांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान मुलांनी आकर्षक पद्धतीने सजवून आणलेल्या नंदीबैलांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तान्हा पोळा हा विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा सण असून, लहान मुलांमध्ये या परंपरेची जपणूक आणि संस्कार रुजावेत, या उद्देशाने महाकाली नगर-१ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपालांनी उत्साहाने सहभाग घेत आपापले सजवलेले नंदीबैल आणले होते. विविध रंगांची सजावट, फुलांची आरास तसेच आकर्षक वेशभूषेमुळे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले. बालगोपालांचा उत्साह वाढविण्यासाठी पारितोषिकांचे आयोजन केले होते. यावेळी एकूण ८ पारितोषिके ठेवण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट नंदीबैल सजावट, आकर्षक वेशभूषेसाठी समावेश होता. उत्कृष्ट सजावट आणि कल्पकतेने सहभागी झालेल्या बालगोपालांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान पालक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालगोपालांचा उत्साह वाढविला. पारंपरिक भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी, तसेच परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक एकोपा वाढावा आणि तान्हा पोळ्यामुळे परिसरातील बालगोपालांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. अशी माहिती आशिष काळे यांनी दिली.





