spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘महाज्योती’च्या भव्य इमारतीचे भूमिपूजन रविवारी

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर :- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर आता एका नव्या पर्वात प्रवेश करीत आहे. ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या संस्थेच्या ७ माळ्याचे प्रशासकीय इमारत आणि १२ माळ्याचे प्रशिक्षण केंद्राच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन येत्या रविवारी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी भूषविणार आहेत. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, ‘महाज्योती’ ही केवळ संस्था नसून सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ आहे. नव्या वास्तूमुळे प्रशिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सुविधा अधिक प्रभावीपणे राबवता येतील.

भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे, आणि वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार मंत्री मा. अॅड. आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे. तर विशेष अतिथीमध्ये खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संदीप जोशी, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रविण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, समिर मेघे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम आदींची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, एनएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मिणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए. बी. धुळाज (भा. प्र. से.), ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे, तसेच प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ‘महाज्योती’ने गेल्या काही वर्षांत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेची दिशा दिली आहे. या नव्या इमारतीमुळे समाजाला अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना नवी गती मिळेल, असे शेवटी मिलिंद नारिंगे यांनी सांगितले.

७ मजली प्रशासकीय इमारत आणि १२ मजली प्रशिक्षण केंद्र होणार

‘महाज्योती’ संस्थेच्या स्वप्नवत प्रकल्पाचा आज नवा टप्पा सुरू झाला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी उभारली जाणारी ही दोन भव्य इमारती ७ माळ्याची प्रशासकीय इमारत आणि १२ माळ्याचे महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे यांचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) मार्फत होत आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च ११४ कोटी रुपये असून, महाज्योतीच्या कार्यक्षमतेत आणि सेवाक्षमतेत अभूतपूर्व वाढ घडवणारा हा पायाभूत उपक्रम ठरणार आहे. या प्रशासकीय इमारतीत तळघर क्रमांक १ व २ मध्ये मुबलक वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर ५०० लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था तसेच प्रशासकीय सभागृह असतील. तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष व उपहारगृह, तर ४, ५, ६ आणि ७ व्या मजल्यांवर प्रशिक्षण कक्ष आणि बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ही इमारत आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधणी आणि कार्यक्षम जागा नियोजनाचा सुंदर संगम ठरणार आहे. दुसरी १२ मजली इमारत ही महात्मा ज्योतिबा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तसेच वस्ती गृहाकरिता असणार आहे. यात आधुनिक सुविधांनी सज्ज अशी वाहनतळ व्यवस्था आणि अभ्यागत कक्ष, व्यवस्थापन कार्यालय असेल. पहिल्या मजल्यावर मुलाखत व समुपदेशन कक्ष, २, ३, ५ आणि ६ व्या मजल्यांवर प्रत्येकी १०० बैठक क्षमतेचे दोन प्रशिक्षण कक्ष तसेच मीडिया स्टुडिओ असणार आहे. ४ थ्या मजल्यावर वाचनालय, ७ व्या मजल्यावर भोजन कक्ष, तर ८ ते १२ व्या मजल्यांवर प्रत्येकी १६ खोल्या अशा एकूण ८० खोल्या असतील. या वस्तीगृहात एकूण २४८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश

शिक्षण म्हणजे फक्त यशाची पायरी नव्हे, तर आत्मविश्वासाची नवी दिशा. ही दिशा ‘महाज्योती’ने गेल्या काही वर्षांत समाजाला दिली आहे. ‘महाज्योती’ने मागील काही वर्षांत समाजात ज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित केला आहे. या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणच दिले नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनमानात आशा आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे, असे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले. २०२१ ते २०२५ या काळात ‘महाज्योती’च्या २ हजार ३५० विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत रुजू होऊन नव्या युगाचा पाया रचला आहे. त्यात ५५ विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हा केवळ आकडा नाही, तर शिक्षणातून आत्मनिर्भर समाज उभारण्याच्या ‘महाज्योती’च्या प्रयत्नांचा सजीव पुरावा आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेत ‘महाज्योती’च्या ६४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या वर्षाच्या युपीएससी परिक्षेत ‘महाज्योती’चे २८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यापैकी ५५ विद्यार्थी कर सहाय्यक निरीक्षक (एसटीआय) तर ९ विद्यार्थी सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) म्हणून निवडले गेले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गातील ४१, व्हीजेएनटी प्रवर्गातील २२, आणि एसबीसी प्रवर्गातील १ विद्यार्थी असून, हे प्रतिनिधित्व शिक्षणातील सामाजिक समतेचे तेजस्वी उदाहरण ठरले आहे. मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांची नव्या युगातील व्याख्या मोफत प्रशिक्षण, डिजिटल सक्षमता आणि सर्वांगीण आधार ‘महाज्योती’ने विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण, निवास, भोजन, प्रवास भत्ता, डिजिटल टॅबलेट, इंटरनेट आणि अभ्यास साहित्य पुरवून स्पर्धा परीक्षेची पारंपरिक संकल्पना बदलून टाकली आहे. युपीएससी, एमपीएससी, एसएससी, आयबीपीएस, यूजीसी-नेट, एमबीए आणि लष्करी परीक्षा यांसारख्या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन उपलब्ध करून देत संस्था प्रत्येक तरुणाला स्पर्धात्मक यशासाठी तयार करत आहे. स्पर्धा परीक्षांबरोबरच ‘महाज्योती’ने ६० हून अधिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवले असून, त्यातून १८ हजार ७७८ युवकांना थेट रोजगार मिळाला आणि १९ हजार ५२८ युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, वस्त्रोद्योग, खेळ, हस्तकला, वित्त आणि वाहतूक अशा विविध क्षेत्रांत युवकांनी आत्मनिर्भरतेची वाट धरली आहे. ‘महाज्योती’ ही केवळ संस्था नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा जिवंत दीपस्तंभ आहे, असे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले.

Popular Articles