◼️शासनाच्या कृषी संबंधी योजनांचा लाभ किती
◼️येत्या हंगामाबाबत कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक
सचिन चौरसिया, रामटेक :- कृषी क्षेत्राशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना शेतीमध्ये कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याबाबत विविध विषयांवर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. कृषी राज्यमंत्री अड. आशीष जयस्वाल यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कृषी योजनाँचा लाभ किती प्रमाणात देण्यात आला. याबाबत आढावा घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी वेगवान कार्यवाहीचे निर्देश दिले. कृषी क्रांती बिरसा मुंडा योजना अंतर्गत १०० टक्के पात्र सर्व आदिवासी शेतकऱ्यांना मोफत सोलर पंप व मोफत बोरवेल देण्यात येणार असल्याची माहिती दिली. लाभासाठी त्यांनी अर्ज करावे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यावरही चर्चा झाली. आधुनिक यंत्रांच्या वापराने शेतकरी व शेतमजुरांचा त्रास कमी होऊन शेती अधिक सुलभ व कार्यक्षम होणार असल्याचे यावेळी सांगितले. भातपीक रोवणी यंत्र वापरासंदर्भात तज्ज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. हिरवळीच्या खतासाठी वापरल्या जाणाऱ्या ठेंचा व बोरी बियाण्यांबाबत चर्चा झाली. विशेष निधीतून यंदासुद्धा बियाणे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ड्रोनद्वारे शेती अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी ‘ड्रोन क्रांती’ विषयावर सादरीकरण करण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोनच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फवारणी, निरीक्षण आणि उत्पादनक्षमता वाढीसाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. शासन कंपन्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. डॉ. प्रशांत कडू यांनी जनावरांच्या खाद्यासाठीही लाभदायक ‘अझोला’ बाबत मार्गदर्शन केले. त्याची उत्पादन पद्धती व उपयोगाबाबत माहिती दिली. शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणारी उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अँग्री मॉल’ संकल्पनेवरही चर्चा झाली. बैठकीला आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर, तालुका कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्याठीपाठाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रा. डॉ योगेश पावशे, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी कटिबद्ध
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेती अधिक सक्षम व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी नमूद केले.