– ठोस निर्णयाऐवजी केवळ प्रस्तावांचे गाजर; १५ मे रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा
हंसराज,भंडारा नागपूर :- गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याऐवजी सरकार आणि प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी बैठकीत पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. “निव्वळ प्रस्ताव पाठवण्यासाठीच नागपूरला बैठक बोलावली काय?” असा संतप्त सवाल खासदार पडोळे यांच्यासह गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने उपस्थित केल्याने बैठकीत मोठा गदारोळ झाला.
नागपूर येथील रविभवन येथे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, अनेक तासांच्या चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय न होता, “पुन्हा प्रस्ताव पाठवू” असे जुनेच आश्वासन मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“नागपुरात बैठक घेऊन त्रास का देता?” बैठकीच्या ठिकाणावरूनही प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला धारेवर धरले. “आमचे प्रश्न भंडारा जिल्ह्याचे आहेत, मग बैठक नागपूरला घेऊन आम्हाला त्रास का दिला जातो?आम्हाला येथे येण्यासाठी खर्च होतो, शारीरिक त्रास होतो, हे प्रशासनाला दिसत नाही का?” असा सवाल बाधितांनी केला. न्याय मागण्यासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल केले जातात, मग आम्ही दाद कुणाकडे मागायची, अशी हतबलताही यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि खासदारांचा हल्लाबोल खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. पुनर्वसन रखडले आहे, जमिनी गेल्या पण मोबदला नाही, रोजगार नाही आणि मूलभूत सुविधांचा पत्ता नाही. प्रशासन केवळ फाईली फिरवण्यात मग्न असून सामान्य जनता वाऱ्यावर आहे.” जामगाव टोला सारख्या गावात आजही जन्म-मृत्यूच्या नोंदी घेतल्या जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
१५ मे रोजी ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा बैठकीत कोणताही मार्ग न निघाल्याने संघर्ष समितीने आता टोकाची भूमिका घेतली आहे. आपल्या रास्त मागण्यांसाठी १५ व १६ मे २०२६ रोजी वैनगंगा नदीकाठी कारधा येथे ‘जलसमाधी’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. “जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, शेवटपर्यंत लढू,” असा निर्धार खा. पडोळे यांनी व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती: या बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावनकुमार, तसेच संघर्ष समितीचे भाऊ कातोरे, आरजू मेश्राम, अतुल राघोर्ते, मनीषाताई भांडारकर, प्रमिलाताई शहारे, विनोद वंजारी, अभिषेक लेंडे, दिलीप मडाने आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.