नागपूर :- हलबा समाज महासंघ, दीनदयाल नगर, नागपूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी हलबा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रावीण्य पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने महासंघाने हा उपक्रम हाती घेतला आहे. महासंघाने 10 वी, 12 वी तसेच पदविका, पदवी आणि इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज महासंघाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय सन २०२६ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रावीण्य पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी दहावी परीक्षेत प्रथम प्रयत्नात ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र राहतील. बारावी परीक्षेसाठी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रथम प्रयत्नात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण, तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती व प्रावीण्य पारितोषिकासाठी अर्ज अध्यक्ष अथवा महासचिव, हलबा समाज महासंघ, सरस्वती ले आऊट, दीनदयाल नगर, नागपूर यांच्या नावे करावेत. अर्जासोबत प्रमाणित गुणपत्रिका तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील. पूर्ण भरलेले अर्ज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी महासंघाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज १ जुलै २०२६ पासून महासंघाच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध राहणार आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी हलबा समाज महासंघाच्या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७१२-२२८९७२७ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.देवराम नंदनवार आणि महासचिव डॉ. रमेश पराते यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.








