spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण

– विविध कृषी योजनांतर्गत भात, तूर, कापूस, ज्वारी पिकांसाठी पेरणीपूर्व ते काढणीपश्चात सहा टप्प्यांत मार्गदर्शन

गडचिरोली :- बदलत्या हवामान परिस्थितीत शेती अधिक किफायतशीर व टिकाऊ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागामार्फत सन २०२५–२६ मध्ये विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतीशाळा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारीपासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञानापर्यंत प्रत्यक्ष शेतातच सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन दिले जात आहे.

जिल्ह्यात पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत २७, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ९७, राष्ट्रीय कृषी विकास योजना – मिलेट मिशन अंतर्गत २, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत १ तसेच आत्मा योजनेंतर्गत १२ अशा एकूण मोठ्या प्रमाणावर शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतीशाळांमध्ये भात, तूर, कापूस व ज्वारी या प्रमुख पिकांचा समावेश असून पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार सहा टप्प्यांत वर्ग घेतले जातात.

शेतीशाळेतील सहा टप्प्यांचे प्रशिक्षण

शेतीशाळेचा पहिला वर्ग पेरणीपूर्व अवस्थेत घेतला जातो. यामध्ये निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांची सभा घेऊन शेतीतील सर्वसाधारण अडचणींवर चर्चा केली जाते. २५ शेतकऱ्यांची निवड करून त्यातून सुविधाकार शेतकऱ्याची निवड, बियाणे निवड, बियाणे व खत खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बिजप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाते.

दुसऱ्या वर्गात पेरणी व रोपावस्थेतील व्यवस्थापनावर भर देण्यात येतो. यामध्ये शेतकऱ्यांचे पायाभूत सर्वेक्षण, गट निर्मिती, बंद पेटी चाचणी तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन संकल्पना, मृद परीक्षण व जमिन आरोग्य पत्रिकेच्या आधारे खत व्यवस्थापन याविषयी माहिती दिली जाते.

तिसऱ्या वर्गात कामगंध सापळ्यांचा उपयोग व व्यवस्थापन, वनस्पतीजन्य कीटकनाशके, दशपर्णी अर्क, बीजामृत, जीवामृत तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. तसेच रस शोषणाऱ्या किडींचे निरीक्षण, पीक परिसंस्था निरीक्षण (सेसा), चित्रीकरण, सादरीकरण व निष्कर्ष काढण्यावर भर दिला जातो.

चौथ्या वर्गात एकात्मिक अन्नद्रव्य व तण व्यवस्थापनासोबतच पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, ठिबक व तुषार सिंचनाचे फायदे आणि पाणी ताण व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते.

पाचव्या वर्गात कीड व रोग व्यवस्थापन (एकात्मिक कीड व्यवस्थापन) या विषयावर प्रमुख कीड व रोगांची ओळख, जैविक व सुरक्षित उपाययोजना यांची माहिती दिली जाते.

सहाव्या आणि अंतिम वर्गात पीक कापणी प्रयोग व शेतीदिनाचे आयोजन करून काढणीपश्चात तंत्रज्ञान, उत्पादन मोजमाप व निष्कर्षांवर चर्चा केली जाते.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून, पाणी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शेतीशाळांमध्येही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

Popular Articles