spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसरच्या ‘फादर एग्नेल स्कूल’ला हायकोर्टाची चपराक; योगेश रंगवानी यांच्या मुलीला पुन्हा प्रवेश देण्याचे आदेश

हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- शिक्षण हक्काच्या लढाईत आणि खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तुमसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश रंगवानी यांनी पुकारलेल्या संघर्षाला मोठे यश आले आहे. तुमसर येथील फादर एग्नेल स्कूलने अतिरिक्त शुल्कवाढीचा निषेध केल्यामुळे सूडबुद्धीने रंगवानी यांच्या अल्पवयीन मुलीला (कु. चित्राक्षी रंगवानी) शाळेतून काढून टाकले होते. या अन्यायाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निकाल देत, शाळेने दिलेले टी.सी. (TC) रद्द करून विद्यार्थिनीला तात्काळ प्रवेश देण्याचे आणि कोणतेही दंडात्मक शुल्क न घेण्याचे आदेश दिले आहेत.

योगेश रंगवानी यांनी शाळेच्या बेकायदेशीर शुल्कवाढीविरोधात पालकांची बाजू लावून धरली होती. याचा राग मनात धरून शाळा प्रशासनाने त्यांच्या मुलीचा प्रवेश रद्द करून तिला शाळेबाहेर काढले होते. स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाने या प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्याने रंगवानी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. “जेथे प्रशासन अपयशी ठरते, तेथे केवळ न्यायालयच संविधानाचे रक्षण करते,” अशी भावना रंगवानी यांनी निकालानंतर व्यक्त केली.

या प्रकरणावर बोलताना योगेश रंगवानी यांनी स्थानिक प्रशासन आणि काही सत्ताधारी नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी जनसामान्यांच्या हितासाठी लढत असताना वैयक्तिक आकसापोटी माझ्या मुलीला लक्ष्य करण्यात आले. दुर्दैवाने, स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि काही नेत्यांनी पीडित विद्यार्थिनीची बाजू घेण्याऐवजी शाळा प्रशासनाचीच पाठराखण केली. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला असता, तर माझ्या मुलीला हा मानसिक त्रास सहन करावा लागला नसता,” असे रंगवानी म्हणाले.

या कठीण काळात माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल रंगवानी यांनी आभार मानले. तसेच, विधानसभेतील ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केवळ एका विद्यार्थिनीला न्याय मिळाला नसून, राज्यातील हजारो पालकांना शाळांच्या मनमानीविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले आहे. “या प्रसंगामुळे मी काही काळ खचलो होतो, मात्र न्यायालयाच्या निर्णयाने माझा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. यापुढेही मी लोकहितासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढत राहीन,” असा निर्धार योगेश रंगवानी यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाचे तुमसर परिसरातून स्वागत केले जात आहे.

Popular Articles