spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घराघरातून निघणाऱ्या कचरा संकलनाला मिळणार अधिक बळ

– महापौर निता ठाकरे यांच्या उपस्थित मनपाच्या कचरा संकलन वाहनताफ्यात ४० वाहनांचा समावेश

नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याच्या दिशेने पाऊल टाकत, शहरातील कचरा संकलनाचे कार्य अधिक प्रभावी व सुलभ व्हावे, नागरिकांना उत्तम व दर्जेदार नागरी सोयी-सुविधा मिळाव्या याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात गांधीबाग महाल झोन ते मंगळवारी झोन दरम्यानच्या ‘डोअर-टू-डोअर’ कचरा संकलन करणाऱ्या वाहन ताफ्यात ४० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. महापौर निता ठाकरे यांनी गुरुवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातून या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. या वाहनामुळे घराघरातून निघणाऱ्या कचरा संकलनाला अधिक बळ मिळणार आहे. या वाहनांमुळे बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वाहनांची संख्या २६० झाली असून, शहरात एकूण ४९० वाहनांद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे.

याप्रसंगी नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सय्यदा बेगम निझाम अंसारी, पूजा पाठक प्रभारी आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, विभागीय स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार, भोला खोब्रागडे यांच्यासह मनपा व बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बीव्हीजी इंडिया लिमिटेडमार्फत झोन क्रमांक ६ ते १० दरम्यान ‘डोअर-टू-डोअर’ कचरा संकलन केले जाते. नव्या ताफ्यामध्ये २० इलेक्ट्रिक आणि २० डिझेलवर चालणाऱ्या अशा एकूण ४० वाहनांचा समावेश आहे. ही वाहने जुन्या वाहनांची जागा घेणार असून, या नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाच्या कामामध्ये गती येईल. शहरातील ज्या भागांमध्ये पूर्वी अनियमित कचरा संकलन होत होते, अशा भागांमध्ये या वाहनांचा वापर करून संकलनाच्या कामात सुधारणा होईल. यामुळे परिसरातील कचरा साचण्याची ठिकाणे कमी होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत मिळणार आहे.

यावेळी महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, “या नवीन कचरा संकलन वाहनांमुळे शहरातील ओला आणि सुका कचरा संकलन व्यवस्था अधिक सुव्यवस्थित होईल. घराघरातून कचरा उचलण्याचे काम प्रभावीपणे होणार असल्याने शहर अधिक स्वच्छ व सुंदर दिसेल,” असा विश्वास ही महापौर निता ठाकरे यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकाद्वारे कचरा संकलन व वाहतुकीकरिता दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मे. Antony waste ltd. यांच्याकडे झोन क्र. १ ते ५ आणि मे. बी.व्ही.जी. इंडिया लि. यांच्याकडे झोन क्र. ६ ते १० मधील घराघरांतून कचरा संकलन करून त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Popular Articles