दापोरी येथे सुपर बस थांबत नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !

0
66
विभाग नियंत्रकाच्या आदेशाला मोर्शी वरूड आगाराने दाखवली केराची टोपली ! 
रुपेश वाळके यांनी दिला आंदोलनाचा ईशारा ! 
मोर्शी १९ : मोर्शी तालुक्यात ५ हजार लोकसंख्या असलेल्या दापोरी गावाला सालबर्डी तिर्थक्षेत्रासह आसपासची ५ गावे जुळलेली आहेत. येथून  शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. पण शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जाणार्‍या विद्यार्थ्यांचा घोडका पाहून वरुड मोर्शी  आगाराचे बस चालक अधिक वेगाने बसेस दामटवतात. परिणामी विद्यार्थ्यांना तासनतास दुसर्‍या बसची वाट पाहत येथे उभे राहावे लागते. आणि विद्यार्थ्यांजवळ पासेस असून सुद्धा जीव धोक्यात घालून खासजी वाहनाने प्रवास करावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून वाहकांच्या असभ्य वागणुकीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वरुड मोर्शी आगाराच्या बसचालक व वाहकावर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी विभाग नियंत्रक अमरावती व परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
     राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या विशेष प्रयत्नाने विभाग नियंत्रक राज्य परिवहन अमरावती यांचे पत्र क्रमांक राप/अम/विनी/वाह/चालन/२७२१ दिनांक ०७/१०/२०११ नुसार दापोरी येथे सुपर एस् टी बस थांबा मिळाला असून दापोरी येथे सुपर बस थांबत नसल्यामुळे वरूड मोर्शी आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे मोर्शी वरूड आगाराच्या विरोधात विद्यार्थी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
वरुड – अमरावती  मार्गावरील धावणार्‍या बस दापोरी बस थांब्यावर थांबत नसल्यामुळे दापोरी येथून दररोज शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोर्शी, वरुड, अमरावती, नागपूर, काटोल, वरूड, जरुड, बेनोडा, हिवरखेड येथे जात असून नौकरदार वर्गांचीही कामावर जाण्याची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे सालबर्डी पाळा येथे तीर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक दर्शनाला जाण्याकरिता दापोरी येथे थांबतात मात्र त्यांना तासनतास बसची वाट पाहत उभे रहावे लागत असून सुपर बसेस दापोरी बस थांब्यावर थांबत नाही. तर काही बसेस विद्यार्थ्यांचा घोळका पाहून बसेस न थांबविता आणखी वेगाने दामटवितात. त्यामुळे प्रवाश्यांना व विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागते.
दापोरी येथे सुपर बसेसचा थांबा १४ वर्षा आधी मिळाला आहे. मात्र परिवहन विभागाचे वाहक व चालक बसेस थांबविण्यात दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराकडे विभाग नियंत्रक यांनी लक्ष देऊन वाहक व चालकांवर कार्यवाही करून दापोरी येथे सर्व प्रकाराच्या सुपर बसेस थांबविण्याचे निर्देश देण्यात यावे अन्यथा दापोरी येथे तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक व विभाग नियंत्रक अमरावती यांना दिला आहे.
आगार प्रमुखांची बघ्याची भूमिका ? 
या गंभीर विषयाबाबत विद्यार्थ्यांनी आगारप्रमुख यांना अनेक तक्रारी करत असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही. मोर्शी येथून विद्यार्थी वरुड मोर्शी आगाराच्या बस मध्ये बसल्यास काही वाहक त्यांना शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देतात, आणि विद्यार्थी बस मध्ये बसल्यास त्यांना मधेच उतरवून देण्याच्या अनेक घटना घडत असून वरूड मोर्शी आगारावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत गंभीर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.