spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

झेंडेपार परिसरात अवैध उत्खननाची माहिती दिल्यास तत्काळ कारवाई – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई :- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार जंगल परिसरात कोणत्याही प्रकारच्या खनिज उत्खननासाठी राज्याच्या वनविभागाकडून परवानगी देण्यात आलेली नसून अवैध उत्खननाबाबत ठोस माहिती मिळाल्यास तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार जंगल परिसरातील कथित अवैध लोहखनिज उत्खननाबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य नितीन राऊत, डॉ. जितेंद्र आव्हाड, किशोर जोरगेवर, मंगेश चव्हाण, नाना पटोले आणि चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, झेंडेपार जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा प्रकारचे खनिज उत्खनन होऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. तसेच कोणाकडेही अवैध उत्खननाबाबत विभाग, रेंज, गाव व सर्वे क्रमांकासह माहिती असल्यास ती देण्यात यावी, त्यावर तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

संबंधित परिसरात काही कंपन्यांना जागा मंजूर करण्यात आली असली तरी त्यांनी अद्याप उत्खननाचे काम सुरू केलेले नाही. मात्र ‘अजिंठा’ नावाच्या कंपनीचा एक ट्रॅक्टर दगडाची ट्रॉली नेत असताना तहसीलदार, पोलीस व वन विभागाने संयुक्त कारवाईत पकडला. जप्त केलेले नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालानुसार नमुन्यांमध्ये अनुक्रमे ८३ टक्के, ७५ टक्के आणि २८ टक्के लोह आढळले. याप्रकरणी ट्रॅक्टर जप्त करून प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पुरखेडा यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

अनुज माइन्स, विमलचंद जैन, अनुज अग्रवाल, आर. एस. राजूरकर आणि मनोजकुमार या कंपन्यांना जागा देण्यात आली असली तरी त्यांनी काम सुरू केलेले नाही, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.