spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नरभक्षक वाघाला त्वरीत जेरबंद करुन मृतक महिलेच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत द्या

– आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांचे वनविभागाला निर्देश

यासीन शेख गोंदिया :- अर्जुनी-मोर. विधानसभा अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण माहुली परिसरासह तालुक्यात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर नरभक्षक वाघाला त्वरीत जेरबंद करून मृतक महिलेच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी दिले आहे.

मृत महिलेचे नाव लक्ष्मी हेमराज सायाम (वय ५५ वर्षे, रा. माहुली) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी शेतात काम करत असताना झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. मात्र तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या घटनेनंतर परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याची चर्चा रंगू लागली असून शेतकरी व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, माहुली व परिसरातील शेतकरी वर्ग शेतीकामासाठी दररोज शेतात जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे तसेच परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे माहुली व आसपासच्या गावांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून मानवी जीविताला सतत धोका निर्माण होत असताना वनविभागाकडून ठोस व प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांचा वाढता संचार आणि त्यातून निर्माण होणारा मानवी जीविताचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने व्यापक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे सयाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने मृत महिलेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व शासकीय सहाय्य द्यावे,व यापुढे अशा घटना घडु नये याची खबरदारी वनविभागाने घ्यावी असेही आमदार राजकुमार बडोले यांनी सांगीतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.