spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिक्रमण,नालेसफाईच्या मुद्द्यावर लक्ष्मीनगर अन् धरमपेठ झोनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

– पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी घेतला आढावा

– नाल्यात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील अवैध बांधकाम, अतिक्रमण, नालेसफाई आणि सिव्हर लाईन चोकेज आदी समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोन कार्यालयात नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी(ता.२२) पार पडली.

नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक,१६,३६,३७,३८ च्या बैठकीत मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ.विपीन यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती तारा (लक्ष्मी) यादव, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम, प्र.अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, स्थापना व प्रकल्प विशेष समिती सभापती अश्विनी जिचकार, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त  राजेश भगत, उपायुक्त गणेश राठोड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी नगरसेवक सर्वश्री दिलीप दिवे, रितेश गावंडे, अमोल शामकुळे, सुनील दांडेकर नगरसेविका वर्षा चौधरी, माया हाडे, कुमुदनी गुडधे, ईश्वर ढेंगळे,  संजय उगले, शैलेन्द्र डोरले, माहेश्वरी पटले लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय धरमपेठ झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक १२,१३,१४,१५ च्या बैठकीत आयुक्त मनपा आयुक्त डॉ. विपीन, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रुतिका मसराम, अतिरिक्त आयुक्त  मुरुगानंथम एम, प्र.अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, नगरसेविका  साधना बरडे, वर्षा चौधरी , पुजा पाठक, योगिता तेलंग, नगरसेवक विनय दाणी विक्रम ग्वालबंशी, योगेश पाचपोर, अभिजित झा, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, संजय कांबळे, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, श्रीकांत वाईकर उपस्थित होते.

बैठकीत नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलिसांत थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मटण मार्केटसह इतर सर्व प्रकारच्या अवैध अतिक्रमणांवर कडक कारवाई करून संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सिव्हर लाईन चोकेजची समस्या सोडवण्यासाठी सर्व दहाही झोनकरिता प्रत्येकी किमान १ याप्रमाणे १० नवीन मशीनची व्यवस्था करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी अवैध बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. मनपाकडून कारवाई झाल्यानंतरही अतिक्रमणधारक पुन्हा त्याच जागी ठाण मांडतात. विशेषतः लक्ष्मीनगर झोनमध्ये अनेक ठिकाणी अवैध मटण मार्केट सुरू झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर तात्काळ आणि कडक कारवाईची गरज असून, अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान स्थानिक नगरसेवक आणि पोलिसांना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

तर लक्ष्मीनगर झोन समिती सभापती लक्ष्मी यादव यांनी नालेसफाईच्या कामात नगरसेवकांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. नाल्याची सफाई केल्यानंतर गलिच्छ कचरा नाल्याच्या बाजूलाच अनेक दिवस पडून राहतो, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच ‘मिशन १०० दिवस’ उपक्रमाची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे व प्रभावीपणे केली जावी, अशी सूचना त्यांनी केली.

याशिवाय शासनाकडून मनपाच्या कोट्यात ५ नवीन सिव्हेज चोकेज क्लिनिंग मशीन मिळणार असून, प्रत्येक झोनमध्ये किमान २ मशीन उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच, घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या अनियंत्रित कारभारावर आणि कचरा संकलन गाड्या वेळेवर येत नसल्याबद्दल कंपनीविरुद्ध कडक कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. तसेच उद्यानांमधील बंद दिवे, गल्लीबोळांतील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि ‘अमृत-२’ योजनेची जलवाहिनी टाकताना नागरिकांना होणारा त्रास याकडे नगरसेवकांकडून आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले.

यावर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्व अधिकाऱ्यांना नगरसेवकांसोबत समन्वय ठेवून आणि त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आदेश दिले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखत अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सर्व झोन कार्यालयांमध्ये ‘नागरिक तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी बैठकीत दिली. याशिवाय शाळा, उद्याने, मैदाने, बाजारपेठ, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक आठवड्यात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धरमपेठ झोनमधील विविध नागरी समस्या संदर्भात घेतलेल्या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी धरमपेठ झोनमधील नाला सफाई, वस्तीतील कचऱ्याचे स्त्रोत, अनाधिकृत बांधकामे, पाण्याची समस्या आणि जीव्हीपी पॉईंट्स बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. बैठकीदरम्यान झोन सभापती धनश्री देशपांडे यांनी नाले सफाई, गडर लाईन चोकेज आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अंबाझरी तलावात येत असलेल्या एमआयडीसीतील घाण पाण्याबाबत आयुक्तांचे विशेष लक्ष वेधून सफाई कर्मचाऱ्यांची माहिती नगरसेवक व नागरिकांना तात्काळ मिळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली. शासकीय सुट्टीच्या दिवशी आणीबाणीच्या प्रसंगी गडर लाईन चोकेजमुळे होणाऱ्या समस्यांची तात्काळ दखल घेण्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका श्रीमती रुतिका मसराम आणि नगरसेवक  विनय दाणी यांनी केली.

याच वेळी कचरा गोळा करणाऱ्या कलेक्शन पॉईंटवर कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट तयार होत असून, नागरिक तिथे दिवसभर कचरा टाकत असल्याच्या समस्येकडे नगरसेवक श्री. योगेश पाचपोर यांनी लक्ष वेधले, सोबतच झोनमध्ये पाण्याचे युनिट वाढवण्याची आणि ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, संपूर्ण झोनमध्ये नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरली. या सर्व समस्यांवर उत्तर देताना मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नाल्यात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात एनडीएसची (उपद्रव शोध शोधक पथक) कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी एनडीएस पथकात जवानांची संख्या वाढवून, कचरा टाकणाऱ्या मुख्य ठिकाणी कारवाईचा वेग वाढविण्याचे थेट निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.