नागपूर १९ : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना समोर आली आहे. एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेतल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे बरॅकमध्ये क्षणात आक्रोश आणि किंचाळ्यांचा गोंगाट पसरला, आणि जेल प्रशासनही हादरून गेले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी कैद्याचे नाव शुभम ठाकूर असून, आरोपी कैद्याचे नाव कृष्णा रमेश तिवारी (वय 26, रा. अंबाझरी) आहे. घटनेच्या दिवशी शुभम ठाकूर झोपलेला असताना कृष्ण तिवारीने त्याला उठवण्यासाठी आरडाओरड केली. झोपमोड झाल्यामुळे चिडलेल्या शुभमने कृष्णाला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद, शिवीगाळ आणि हातघाई झाली. हाणामारीदरम्यान संतप्त झालेल्या कृष्णा तिवारीने थेट शुभमच्या गुप्तांगावर दाताने चावा घेतला. या चाव्यामुळे शुभम गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना समजताच तुरुंगातील सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून प्रकार नियंत्रणात आणला. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा तिवारीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या तुरुंगात घडलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासकीय यंत्रणांपुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.



