खापा :- बडेगाव (ता. सावनेर) शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकमान्य विद्यालय, बडेगाव येथे ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामूहिक गायन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन कुरवाडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिषेकसिंह गहरवार, संचालक, प्लॅनेट आयटी संगणक संस्था, सावनेर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नितीन निरगुडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून ‘वंदे मातरम’ गीताची निर्मिती, इतिहास आणि देशप्रेम जागवणारी पार्श्वभूमी स्पष्ट केली. यानंतर शिक्षक विजय गिरी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील ‘वंदे मातरम’ गीताचे योगदान आणि त्याचे राष्ट्रीय महत्त्व यावर प्रकाश टाकला.
प्रमुख अतिथी अभिषेकसिंह गहरवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अखंड भारताच्या निर्मितीत ‘वंदे मातरम’ गीताने दिलेली प्रेरणा आणि राष्ट्रीय एकात्मतेतील त्याचे योगदान आणि राष्ट्र प्रथम भावनेतून देशभक्ती ला अधोरेखित केले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गजानन कुरवाडे यांनी सांगितले की, ‘वंदे मातरम’ हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रेरणेचा मंत्र बनले असून आजही भारतीयांमध्ये एकता, बंधुता आणि देशप्रेम जागृत ठेवते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका जया हुमणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक दिलीप इंगोले यांनी मानले.
या प्रसंगी शिक्षक दिलीप इंगोले, नितीन निरगुडे, विजय गिरी, शिक्षिका वर्षा ठाकरे, जया हुमणे, प्लॅनेट आय टी च्या शिक्षिका नताशा देशमुख आणि काजल गहरवार तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचा परिसर “वंदे मातरम”च्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि उपस्थित सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली गेली.








