spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“स्वतःचीच पाठ थोपटण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोला! सत्कारवेड्या नेत्यांवर नरेश ईश्वरकरांचा कडाडून प्रहार”

– जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांवरून सरकारला घेरले.

हंसराज,भंडारा :- “आपल्या हातानेच आपली पाठ थोपटण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर उत्तर द्या. जिल्ह्यात विद्यार्थी शिक्षकांविना शिक्षण घेत आहेत, शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला आहे, धानाचे परे वाळत आहेत; मात्र नेते सत्कार सोहळ्यांमध्ये व्यस्त आहेत,” अशी बोचरी टीका जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती नरेश ईश्वरकर यांनी केली.

भंडारा येथे आयोजित नवनियुक्त राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ईश्वरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पूर्व विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लावलेले धानाचे परे आता वाळू लागले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये शेकडो शिक्षकांची पदे रिक्त असून अनेक शाळा शिक्षकांविना सुरू आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे.

ईश्वरकर यांनी म्हटले की, नुकताच शिक्षक भरतीसाठी हजारोंचा मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेनेही शिक्षक भरतीसाठी ठराव मंजूर करून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. तरीही शिक्षक भरतीचा निर्णय होत नाही. उलट जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. जनतेच्या पैशातून जनतेची कामे करण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच स्वतःचा गौरव करण्यात वेळ घालवणे दुर्दैवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

“विद्यार्थ्यांना शिक्षक, शेतकऱ्यांना पाऊस आणि न्याय हवा आहे; सत्कार नव्हे.” असे सांगत ईश्वरकर यांनी शासनाने तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी आणि जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

ईश्वरकर यांच्या या वक्तव्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले असून, सत्कार सोहळ्यांपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, हा संदेश त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना दिल्याची चर्चा सुरू आहे.

Popular Articles