spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कारधा येथे आंतरमहाविद्यालयीन कॅनोइंग व कयाकिंग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

– खेळाडूंनी चिकाटी आणि शिस्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करावे : रा. स्व. संघाचे प्रचारक प्रसन्न हरदास यांचे आवाहन

– नागपूर विद्यापीठ व लाखनी-रामटेक महाविद्यालयांचा संयुक्त उपक्रम 

हंसराज,भंडारा :- विद्यार्थी दशेत कठोर परिश्रम, नियमित सराव, चिकाटी आणि शिस्तीच्या बळावरच एक उत्तम खेळाडू घडतो. विद्यार्थ्यांनी या गुणांची कास धरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्रसन्न हरदास यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली, लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा (वाघ) संचलित स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखनी आणि गोंदिया एज्युकेशन सोसायटी संचलित नरेंद्र तिडके आर्ट अँड कॉमर्स कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन कॅनोइंग व कयाकिंग (महिला व पुरुष) निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

वैनगंगा नदीकाठी कारधा (जि. भंडारा) येथील वॉटर स्पोर्ट अकॅडमीच्या निसर्गरम्य परिसरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी या राज्यस्तरीय दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मुख्य अतिथी प्रसन्न हरदास यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले; तसेच या वॉटर स्पोर्ट अकॅडमीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

खेळाडूंसाठी भव्य वसतिगृहाचा प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर : दिलीप मेहेर

कार्यक्रमात बोलताना दिलीप मेहेर यांनी भंडारा वॉटर स्पोर्ट अकॅडमीला विद्यापीठाच्या स्पर्धांचे यजमानपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भविष्यात येथे ‘आंतरविद्यापीठ’ (Inter-University) स्तरावरील भव्य स्पर्धांचे आयोजन करता यावे, यासाठी खेळाडूंकरिता मोठे वसतिगृह (होस्टेल) आणि अद्ययावत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, तो लवकरच मंजूर होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

खेळाडू आज शासकीय पदांवर अधिकारी : डॉ. गणेश कापसे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी केले. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे आभार मानले. या वॉटर स्पोर्ट अकॅडमीतून सराव करून अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून, क्रीडा कोट्यातून शासकीय सेवेत अधिकारी पदावर कार्यरत होत रोजगार मिळवला असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

विभागातील एकमेव सुसज्ज अकॅडमी : अविनाश निंबार्ते

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख अविनाश निंबार्ते यांनी स्पर्धेची नियमावली व पद्धती स्पष्ट केली. प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ही अकॅडमी कयाकिंग व कॅनोइंगच्या सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली संपूर्ण विभागातील एकमेव अकॅडमी असल्याचे सांगून आगामी काळात येथून जागतिक दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संभाजी भोसले आणि नरेंद्र तिडके कॉलेज रामटेकचे प्राचार्य डॉ. शरद पोकळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा संदेश पाठवले. या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा भारतीचे गिरीपुंजे , संजय बटवे, डॉ. चंद्रमोहन सिंग (रामटेक), डॉ. रोमी अधिकारी (भंडारा), डॉ. सुनील चतुर्वेदी (साकोली), डॉ. अरविंद भुजाडे (साकोली), डॉ. यु. पी. शहारे, डॉ. मंगेश वंजारी, डॉ. सागर पारंगणे, डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे, सुनील भोयर, दीपक वाघाये यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संचालन स्पर्धा प्रमुख डॉ. विवेक शाहू यांनी केले, तर आभार स्पर्धा प्रमुख डॉ. सुधीर सहारे यांनी मानले.

Popular Articles