हंसराज,भंडारा :- पिपरी पुनर्वसन, ता. व जि. भंडारा येथील आठवडी बाजारामध्ये सन २०२५ पासून दुकानदारांकडून कथितरीत्या नियमबाह्य वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त पिपरी पुनर्वसन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) तसेच पंचायत समिती भंडाराचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायत पिपरी पुनर्वसनचे सरपंच देविदास विक्रम ठवकर हे सन २०२२ पासून पदावर कार्यरत असून, सन २०२५ पासून आठवडी बाजारातील दुकानदारांकडून ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया न पाळता वसुली करण्यात येत असल्याचा आरोप आहे. तसेच वसूल करण्यात आलेली रक्कम ग्रामपंचायतीच्या अधिकृत खात्यात जमा करण्यात आली आहे काय, तिची रोकडवही व इतर आर्थिक अभिलेखांमध्ये नोंद आहे काय, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
काही दुकानदारांना कथित बनावट पावत्या देऊन वसुली करण्यात आल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वसुलीच्या पावती पुस्तकांची, जमा-खर्च नोंदींची, ग्रामपंचायत सभांचे इतिवृत्त व ठरावांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात केवळ सरपंचांचीच नव्हे, तर संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आठवडी बाजारातील दुकानदार, संबंधित ग्रामस्थ आणि वसुलीमध्ये सहभागी असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या व्यक्तींचे स्वतंत्र जबाब नोंदवून वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चौकशीमध्ये आर्थिक अनियमितता अथवा नियमबाह्य वसुली झाल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर लागू कायदे व नियमांनुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी व योग्य कार्यवाही करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने पूर्वसूचना देऊन कायदेशीर मार्गाने मोर्चा व आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते भाऊ कातोरे, ग्रामपंचायत सदस्य नाशिक चवरे यांच्यासह बहुसंख्य पिपरी पुनर्वसन येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता या तक्रारीची जिल्हा परिषद प्रशासनाकडून कितपत गांभीर्याने दखल घेतली जाते, चौकशी कधी सुरू होते आणि चौकशीअंती नेमके काय निष्पन्न होते, याकडे पिपरी पुनर्वसन येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








