spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कार्यकर्ते टिकवण्यासाठी पैसा नव्हे तर प्रेम लागते

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई :- माणसे टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम लागते. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकी नावाचा प्रकार शिल्लक नसल्याने त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकले, ना नेते, ना उमेदवार. पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही. मात्र प्रेमाच्या जीवावर जगही जिंकता येते. दुसऱ्याला तुसड्यासारखे वागवण्याचे, घर बंद ठेवून लोकांना दारात ठेवण्याचे धंदे भाजपा-महायुती करत नाही. आम्ही प्रेमाच्या जीवावर माणसे जिंकतो. त्याला पैशाची गरज लागत नाही, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी फोडाफोडी आणि पैशाचा वापर झाल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करताना बन म्हणाले, तुम्हा लोकांना ना प्रेमाची किंमत आहे, ना माणसांची, ना निष्ठेची. घर बंद करायचे, लोकांना प्रवेश द्यायचा नाही, कार्यकर्त्यांना भेटायचे नाही, आमदारांना दारातून परत पाठवायचे हे सगळे उद्योग तुमचे आहेत. त्यामुळे ना उमेदवार टिकत ना कार्यकर्ते, अशी अवस्था उबाठा गटाची आणि संजय राऊतांची झाली आहे.

बन पुढे म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक नाही. या निवडणुकीला नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती मतदान करतात. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातील आकडेवारी स्पष्ट आहे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महायुतीचे सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य आहेत. महायुतीचे सर्वात जास्त पंचायत समिती सभापती आहेत. ही सारी आकडेवारी पाहता महायुतीचा विजय होणार हे 100 टक्के निश्चित होते. त्यामुळे तुम्हाला खात्री होती की आपला पराभव होणार. याच पराभवाच्या भीतीपोटी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. घोडेबाजार करण्याची भाजपा किंवा महायुतीला अजिबात गरज नाही आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्या जोरावर आम्ही विधान परिषदेच्या सर्व 17 जागा जिंकू, असा ठाम विश्वास बन यांनी व्यक्त केला.

संजय राऊत, महाराष्ट्र पॅटर्न काय आहे हे देशाला माहिती आहे. महाराष्ट्राचा पॅटर्न हा जनतेचा पॅटर्न आहे. प्रत्येक निवडणुकीत माघार घ्यायची ही महाविकास आघाडीची सवय झाली आहे. कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी गाजावाजा करून विदर्भात अनेक उमेदवार देत सांगितले होते की काँग्रेस ही निवडणूक लढणार. परंतु हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचे उमेदवार सांभाळता आले नाहीत. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. उबाठा गटाबाबतही तेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांनीही माघार घेतली. माघार घेणे, स्थगिती देणे हाच महाविकास आघाडीचा धंदा झाल्याने महाविकास आघाडीचे नाव बदलून आता माघार विकास आघाडी ठेवले पाहिजे, अशी खिल्ली बन यांनी उडवली.

Popular Articles