नागपूर :- १३ जुलै २०२६ रोजी जनशक्ती मंचाच्या वतीने सोमवारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन इटनकर यांना मनपा शाळांच्या गुणवत्तावाढी संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या दशकभरात मनपाच्या अनेक शाळा बंद पडत असून शिक्षकांची कमतरता, शिक्षणाच्या दर्जात अपेक्षित सुधारणा न होणे, शाळांच्या इमारतींची दुरवस्था, देखभाल व दुरुस्तीचा अभाव, आधुनिक डिजिटल साधनांचा अपुरा वापर, तसेच उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत आहे. यामुळे सीबीएसई पद्धतीच्या खासगी शाळांनी शिक्षणाचे व्यापारीकरण केले असून पालकांकडून मनमानी शुल्क आकारले जात आहे. काही शाळांकडून शुल्क भरण्यासाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात असल्याने पालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे जनशक्ती मंचाने निवेदनात म्हटले आहे. मनपा शाळांचा दर्जा उंचावून गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त विपिन इटनकर यांनी मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, लवकरच चिचभवनसह इतर ठिकाणी काही सुधारित उपक्रम राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले. निवेदन देताना जनशक्ती मंचाचे मनू दत्ता, श्याम वाद्य, रमेश मेहता, मुन्ना महाजन, नितीन नायडू, सुरेश रेवतकर, अरुण केदार, भगवानदास राठी, सिद्धू कोमजवार, माधव भोंडे, अरविंद पुरोहित, सतीश यादव, शुभम दास, जंगबहादूर यादव, डॉ. गोहर पटेल, सुनील चोखारे, दीपक पोहणेकर, संजय मेश्राम, मनोज कुहिकर आणि निनाद दीक्षित उपस्थित होते.








