– १५ जुलै रोजी ज्ञानेश्वर नगर व जुनी शुक्रवारी येथे दोन ठिकाणी अंतिम स्कॅनिंग कॅम्प; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मोफत स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन माते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत असून हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
मंगळवारी दक्षिण नागपुरातील महालक्ष्मी सभागृह (चंडिका नगर, बसा रोड), रमणा मारुती मंदिर समाजभवन, पुरातन झिऱ्याचा मारुती मंदिर (चंदन नगर), शितला माता मंदिर (सोनझरी नगर) तसेच सक्करदरा आदर्श गृहनिर्माण सोसायटी हॉल (चक्रधर नगर) येथे आयोजित स्कॅनिंग कॅम्पमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने विविध वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांची आवश्यक प्रक्रिया करण्यात आली.

महाआरोग्य शिबिराच्या स्कॅनिंग टप्प्याचा समारोप बुधवार, दि. १५ जुलै रोजी होणार असून अंतिम दिवशी दोन ठिकाणी स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. नवदुर्गा कालीमाता मंदिर (वैरागडे हॉस्पिटल समोर, ज्ञानेश्वर नगर) आणि कबड्डी ग्राउंड (वनिता विकास शाळेच्या बाजूला, जुनी शुक्रवारी) येथे कॅम्प होतील.
स्कॅनिंगमध्ये शस्त्रक्रिया अथवा विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचे निदान झालेल्या गरजू रुग्णांवर पुढील टप्प्यात पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम दिवशीही अधिकाधिक नागरिकांनी स्कॅनिंग कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक संदीप जोशी, सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे व रितेश पांडे यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक विशेष परिश्रम घेत आहेत.
या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संदीप जोशी तसेच सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे.








