spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट

– जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती

– वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

गडचिरोली :- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच केलेल्या बिनागुंडा परिसराच्या ऐतिहासिक दौऱ्यात तालुकास्तरीय यंत्रणांनी दुर्गम भागात प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचवाव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या निर्देशांच्या अनुषंगाने आज भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त क्षेत्रभेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात आयोजित या भेटीदरम्यान बिनागुंडा गावातील गोटूल येथे सभा घेण्यात आली. या सभेला बिनागुंडा परिसरातील कुवा कोडी, तुरेमर्का आणि फोदेवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच निर्देश देण्यात आले.

यावेळी वनपट्टेधारकांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शासनाच्या विविध कृषी, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. तसेच घरकुल योजना, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत स्तरावरील सुविधा, वन विभागाच्या योजना आणि इतर शासकीय उपक्रमांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

सभेदरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, वन विभाग, आरोग्य विभाग, तहसील कार्यालय तसेच इतर विभागांशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. तर वरिष्ठ स्तरावरील किंवा इतर विभागांशी संबंधित प्रश्नांबाबत समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून ग्रामस्थांना आश्वस्त करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी वानखेडे, क्षेत्रीय वन अधिकारी अमर भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धाकटे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कोतवाल आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.