– तीन बोलेरो पिकअपसह २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त; १४ जनावरांची सुटका
कन्हान :- पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन बोलेरो पिकअप वाहनांमधुन वाहतुक करण्यात येत असलेल्या १४ जनावरांची सुटका करण्यात आली असुन वाहनांसह एकुण २८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार खान मकबुल खान वय २७ वर्ष, रा. बरघाट, ता. बरघाट, जि. शिवणी याच्यासह अन्य आरोपी जनावरांना कोंबुन त्यांच्यासाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीकरिता वाहतुक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (दि.१७ ) ऑगस्ट २०२६ रोजी कन्हान पोलीस हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन अवैधरीत्या म्हशींची कत्तलीकरिता वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कन्हान पोलिसांनी राष्ट्रीय महा मार्ग क्र. ४४ वर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान समोर तीन बोलेरो पिक अप वाहने पोलिसांना मिळुन आली. यामध्ये एम.पी. २८ झेड. आर. ५२३४ या वाहनाचा चालक आकाश श्रीराम इनवाती वय २४ वर्ष, रा. जमुनिया कला, ता. बिछवा, जि. छिंदवाडा, एम.पी. २८ झेड. आर. ५३६१ या वाहनाचा चालक राजेश प्रताप कुलतिया वय ३३ वर्ष, रा. उलवाडी, ता. बिछवा, जि. छिंदवाडा तसेच तिसऱ्या वाहनाच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेत ले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे . १४ जनावरांची सुटका करून तीन वाहनांसह २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने कन्हान पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.








