spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कारगिल विजय दिवस – शौर्य आणि बलिदानाची अमरगाथा

 
प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर २६ : प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या स्फुरणदायक वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जुलै १९९९ या दिवशी भारतीय जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत प्राणांची आहुती देत कारगिलमध्ये विजय मिळवला, त्या पराक्रमाच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात ‘भारत माता पूजन’ करून झाली. यानंतर ‘ *अमर जवान’* स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून वीर शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या वर्षीच्या कारगिल विजय दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे कारगिल युद्धात थेट सहभागी झालेले शौर्यवंत ब्रिगेडियर सुनील गावपांडे (निवृत्त) यांची उपस्थिती. त्यांनी आपल्या अनुभवातून युद्धातील प्रसंग विद्यार्थ्यांसमोर अत्यंत हृदयस्पर्शी शैलीत कथन केले. त्यांच्या बोलण्यातून भारतीय जवानांचे शौर्य, चिकाटी, आणि मातृभूमीप्रेमाचे दर्शन घडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट सीडीआर (डॉ.) विक्रांत मल्हान, तसेच सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँडव्होकेट अशोक बन्सोड, श्री भालचंद्र कागभट (उपाध्यक्ष),
श्री विजय कागभट (सचिव), एअर फोर्सचे ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे, आणि शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
कारगिल विजय सप्ताह अंतर्गत संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये –
कारगिल विजयावर आधारित कविता सादरीकरण,प्रश्नमंजुषा स्पर्धा,साइटेशन लेखन, ‘ऑपरेशन सिंदूर’, स्लाईड शो इत्यादींचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी सभागृह भारावून गेले. त्यानंतर केलेल्या देशभक्तीपर नृत्य, योगा प्रात्यक्षिक, व तलवारबाजी यांच्या जोरदार सादरीकरणाने प्रेक्षकांमध्ये स्फुरण निर्माण झाले. टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषाने सभागृह दणाणून गेले.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणे, लष्करी सेवेची प्रेरणा देणे, आणि वीर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करणे हे होते – जे प्रभावीपणे साध्य झाले.
कार्यक्रमाचे उत्तम संचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती शोमा पाल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी उभे राहून राष्ट्रगीत गात अत्यंत गौरवपूर्ण पद्धतीने करण्यात आली.
सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून वीर जवानांप्रती कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला.

Popular Articles