spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोलीत ‘कर्मयोगी’ पुरस्कारांचा गौरव सोहळा संपन्न; पत्रकार राशीद कुरैशी यांचा सन्मान

– नवनियुक्त नगरसेवकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार

हंसराज, प्रतिनिधी भंडारा साकोली :- येथील सेंदूरवाफा भागातील शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शामराव बापू स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच नवनियुक्त नगरसेवकांचेही अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार सुनील मेंढे उपस्थित होते. मंचावर साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा देवश्री कापगते, होमराज पाटील कापगते, सचिन आगरकर, अमोल मुंगमुंडे, यशवंत उपरीकर, राकेश बोरकर, रोहिणी मंगलमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शामराव बापू स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या विविध स्तरांत प्राविण्य मिळवणाऱ्या व्यक्तींची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार, मातोश्री महिला पुरस्कार, शेती, औद्योगिक सेवा, साहित्यिक, युवा, श्रमिक, उद्योग, दिव्यांग, कृषी गौरव, वनश्री, सेवानिवृत्ती, युवती आणि विशेष बालविकास अशा विविध श्रेणींतून कर्मयोगींना पुरस्कृत करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीने विशेष ठसा उमटविल्याबद्दल दैनिक ‘नवभारत’चे साकोली प्रतिनिधी राशीद कुरैशी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सोबतच साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनियुक्त निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जनसेवेचा वसा घेऊन शहराच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामराव बापू स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, सचिव ॲड. मनीष कापगते, कोषाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, उपाध्यक्ष दुलीचंद कोसलकर, सहसचिव आत्माराम पटले व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.