– गुन्ह्यातील आतापर्यंतचा हा तिसरा अटक आरोपी; ‘RK Bha’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून रचला होता कट
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका महिलेचे बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करत तिची सामाजिक बदनामी करणाऱ्या मुख्य आरोपीला भंडारा सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित भाजिनाथ शिंदे (वय २०, रा. अदासी, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, हा तिसरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने भंडारा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एका अज्ञात व्यक्तीने ‘RK Bha’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर पीडित महिलेचे गावातील एका पुरुषासोबतचे बनावट (मर्फ केलेले) आक्षेपार्ह फोटो प्रसारित केले होते. या कृत्यामुळे महिलेची समाजात मोठी बदनामी झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी रोहित शिंदे याने आपल्या मित्राचा मोबाईल मागून घेतला आणि त्या मोबाईलवरून ‘RK Bha’ नावाचा ग्रुप तयार केला. याच ग्रुपवरून त्याने महिलेचे बनावट फोटो व्हायरल केले होते. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी रोहितला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक फौजदार गजभिये, पोलीस हवालदार राऊत, पोलीस हवालदार आंबेडारे व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी आणि कोणाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.




