– बेझनबाग कार्यालयात काँग्रेसचे अभिवादन
नागपूर :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयात दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या कार्यातून नेतृत्वाची ऊर्जा मिळते. आजच्या काळात त्यांच्या ठामपणाची आणि सामाजिक संवेदनशीलतेची अधिक गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. राऊत यांनी केले.
यावेळी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत की, इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटाओ या धोरणाने देशातील वंचित, शोषित आणि दुर्बल वर्गाला नवसंजीवनी दिली. त्यांनी केवळ घोषणा केली नाही, तर ती कृतीत उतरवली आहे. तर सरदार पटेल यांनी विविध संस्थानचे विलीनीकरण करून अखंड भारताची निर्मिती करून भारताच्या एकतेचा पाया घातला. यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.



