spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती संपन्न

यवतमाळ :- ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तर्फे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ येथे करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार व नागेश वि. वकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), यवतमाळ यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून चारूदत्त देवतळे, पर्यवेक्षक पांडव, ज्येष्ठ शिक्षिका उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून सोनाली भोयर, पॅनल वकील यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सोनाली भोयर यांनी ‘शिक्षणाचा अधिकार’, मूलभूत हक्क, संवैधानिक सक्षमीकरण, तसेच पोक्सो कायदा २०१२ आणि अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक बालकाला ६ ते १४ वयोगटापर्यंत मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे, तसेच खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बालकांवर होणारा शारीरिक व मानसिक छळ रोखण्याचे कायदेशीर उपाय, चांगला व वाईट स्पर्श यातील फरक, आणि सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना सावध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात दिपक एच. दाभाडे यांनी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, बौद्धिक विकास, तसेच अंमली पदार्थांच्या सेवनावरील कायदे (एन डी पी एस Act, 1985) आणि त्यांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बोंडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मंदा बांदरे यांनी केले. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles