– तुकाराम मुंढेंच्या टीमची मोठी कारवाई
मुंबई :- लहान मुलं असतील, कॉलेजमधील तरुण तरुणी असतील सगळ्यांचा फेव्हरेट असलेल्या पिझ्झावर आता तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध विभागाने पोलखोल केली आहे. मुंबईत डॉमिनोज पिझ्झा आउटलेटसह तीन खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. अशातच मुंबईतील डॉमिनोज पिझ्झा, माज फूड पार्सल अँड केटरिंग आणि मुघल ढाब्यावर FDA ने कारवाई केली आहे. परळमधील डॉमिनोज पिझ्झाचा परवाना निलंबित केला आहे. तपासणीत अन्नसुरक्षेतील गंभीर त्रुटी आढळल्याचा FDA चा दावा आहे.
व्हेज आणि नॉनव्हेज एकाच ओव्हनमध्ये
एफडीएने केलेल्या कारवाईबद्दल सांगितलं की, परळ भागातील डोमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटमध्ये ही कारवाई केली. या आऊटलेटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच डीप फ्रीजरमध्ये ठेवल्याचं तपासणीत उघड झालं आहे. या आऊटलेटमध्ये चिकन आणि पनीर एकाच ओव्हन किंवा ग्रिलवर तयार केलं जात असल्याचं FDA च्या तपासणीत समोर आहे. तसंच ऑगस्टमध्ये जारी केलेल्या सुचनेमध्ये काही त्रूटी आढळल्या आहे. अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकिंग साहित्याचा आवश्यक अनुरूपता अहवाल सादर न केल्याचं FDA चं निरीक्षण आहे. ९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली तेव्हा नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं.
माज फूड पार्सल अँड केटरिंगमध्ये बटरच नाही
तर भांडुपमधील माज फूड पार्सल अँड केटरिंगचा परवाना निलंबित केला आहे. इथं स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याची माहिती समोर आली आहे. माज फूड पार्सल अँड केटरिंगमध्ये अस्वच्छ नाले, खाद्यपदार्थांवर लेबल नसणे आणि कृत्रिम खाद्यरंग आढळल्याचा FDA चा दावा आहे. एवढंच नाहीतर मेन्यूमध्ये बटरचा उल्लेख; मात्र प्रत्यक्षात फॅट स्प्रेड वापरून ग्राहकांची दिशाभूल केल्याचं तपासणीत समोर आलं आहे. भाजी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र चॉपिंग बोर्ड नसल्याचं तपासणीत उघड झालं आहे.
तर, कुर्ल्यातील प्रसिद्ध मुघल ढाब्याची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. शिळं अन्न मिळाल्याच्या तक्रारीनंतर FDA ची तपासणी केली. तेव्हा मुघल ढाब्यात अन्नकचऱ्यामुळे तुंबलेले नाले, अस्वच्छ पाणी आणि गंजलेली भांडी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील तीन खाद्य आस्थापनांवर अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ हजार ३८२ किलो खाद्यतेल जप्त
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ हजार ३८२ किलो संशयित भेसळयुक्त आणि चुकीचं लेबल लावलेलं खाद्यतेल जप्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जप्त केलेल्या खाद्यतेलाची किंमत २३ लाख ३५ हजार रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल पॅकिंग युनिटचा परवाना निलंबित केला आहे. अस्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहे. तपासणीत खाद्यतेल पॅकिंग युनिटला २०६ पैकी केवळ १० गुण मिळाले आहे. FDA कडून ‘नियमांचे पालन न करणारे’ घोषित केलं आहे.








