– २६ गोवंशीय जनावरांची सुटका; २२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
पांढरकवडा :- नागपूर-हैदराबाद महामार्गावरून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत २६ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत ट्रकसह एकूण २२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पांढरकवडा उपविभागातील पाटणबोरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एम.एच-३१-सी.बी-६४९० क्रमांकाच्या ट्रकमधून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी नागपूरकडून हैदराबादकडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरटीओ चेक पोस्ट, पिंपळखुटी येथे नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित ट्रक पोलिसांना दिसताच त्यास थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने ट्रक आधी थांबवून त्यानंतर मदतीने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता ट्रक चालक व त्याचा साथीदार पसार झाले.
त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये २६ गोवंशीय बैल/गोऱ्हे आढळून आले. जनावरांना अत्यंत दाटीवाटीने बांधण्यात आले होते. ट्रकमध्ये हवा व प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने तसेच चारा-पाण्याची सोय नसल्याने जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. त्यातील काही जनावरे व्याकूळ झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत २६ गोवंशीय जनावरांची किंमत ६ लाख ६० हजार रुपये, तर गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा ट्रक १५ लाख रुपये, असा एकूण २२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी ट्रक चालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात प्राणी निर्दयतेने वागणुकीचे अधिनियम तसेच प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोहेकॉ सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, पोना किशोर आडे, पोकाॅ सलमान शेख, रजनीकांत मडावी, सतीश फुके व नरेश राऊत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





