खापा, वार्ताहर :- राज्य सरकारने सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली असली तरी, नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध भागात या सुगंधित तंबाखू, गुटख्याचा वापर व मागणी वाढत असल्याने, त्यातून या साहित्याची अवैध वाहतूकही वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन धडपडत असले तरी, या तस्करीच्या मुळाशी कुणीही जात नाही. लगतच्या मध्यप्रदेशातील पांढुर्णा व छिंदवाडा हे दोन जिल्हे या तस्करीचे मुख्य केंद्र बनले असले तरी, ते कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. उलट याच तस्करीतून काही मंडळी मालामाल झाली आहे.
दबंग प्रशासकीय सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र (मुंबई ) विभागात आयुक्त पदभार सांभाळल्यावर पूर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याचाच परिणाम मंगळवार (दि.२ मे) रोजी मध्यरात्री अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर खापा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग करीत असताना, चारचाकी वाहनाने अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू वाहतुकीची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे प्राप्त झाली असता. खापा पोलीस स्टेशन जवळील जवाहर हायस्कूल टी पॉइंट येथे नाकाबंदी करून संशयित चारचाकी वाहन क्र. एम एच १३ ई एफ ३३४४ थांबवण्यात आले. या आलिशान स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता, त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला.
वाहतूक करणारे विक्रम चिरकूट वंजारी (वय ४७ वर्ष), विश्वदीपक विक्रम वंजारी (वय २२ वर्ष) दोन्ही रा. भोजपूर, गणपती नगर, रामटेक जि. नागपूर येथील रहिवासी आहे. वाहन झडतीतून विविध कंपनीचे १३० किलो १,०३,१२० रुपयाचा सुगंधित तंबाखू व वाहन किंमत २४ लाख असा एकूण २५,०३,१२० रुपयांचा मुद्देमाल पंच गणेश आष्टनकर, पोलीस पाटील रमाकांत खडके यांच्या समक्ष जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी राजेश यादव यांच्या फिर्यादीवरून दि. ३ मे रोजी वाहतूक करणाऱ्या इसमांना अटक करून भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३, २७४, २७५, २२३ सह कलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना माननीय कोर्टा समक्ष हजर करून तीन दिवसांचा रिमांड मागण्यात आला. माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी रिमांड मंजूर केला.
सदर कारवाई खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पी. एस. आई. जगदीश पालीवाल, पी. एस. आई. सचिन जंगम, नितेश चिपडे, परवेज शेख, श्याम सोळंकी, निलेश गावंडे, हिमांशू मेंढे यांनी केली.








