हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि प्रलंबित जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी भंडारा शहरात ‘सकल ओबीसी महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) भंडारा जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला असून, सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन खंबीर नेतृत्व चरण वाघमारे यांनी केले आहे.
भंडारा येथील ऐतिहासिक दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सकाळी १०.०० वाजता हा भव्य मोर्चा निघणार आहे. आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजाचा अधिकृत डेटा सरकारकडे उपलब्ध होणार नाही. यामुळे भविष्यात आरक्षण, शैक्षणिक सवलती आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सकल ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’ असा एल्गार या मोर्चाच्या माध्यमातून पुकारला जाणार आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडताना चरण वाघमारे म्हणाले की, “ओबीसींची जनगणना ही केवळ तांत्रिक बाब नसून तो समाजाच्या अस्तित्वाचा आणि घटनात्मक हक्काचा लढा आहे. ‘ज्याची जेवढी संख्या भारी, तेवढी त्याची भागीदारी’ या न्यायाने संसाधनांचे वाटप होण्यासाठी जातिनिहाय जनगणना हाच एकमेव मार्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या मागणीसाठी पहिल्यापासून आग्रही आहे आणि यापुढेही रस्त्यावरचा लढा सुरूच राहील.”
वाघमारे यांनी पुढे असेही नमूद केले की, “येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून ओबीसी बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता दसरा मैदान येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून आपली शक्ती दाखवून द्यावी, असे कळकळीचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.




