नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि यशस्वी राजकीय प्रवासाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या ‘अर्जिंक्य योद्धा’ या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याची माहिती प्रेस क्लब येथील पत्रपरिषदेत आयोजित करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, ग्रंथाचे लेखक प्रा. अरुण कणेर आणि प्रकाशक गणेश राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी ग्रंथ निर्मितीमागील प्रेरणा, संशोधन प्रक्रिया, पुस्तकातील वैशिष्ट्ये तसेच त्यातील प्रमुख विषयांची सविस्तर माहिती दिली. आयोजकांनी सांगितले की, रविवारी ५ जुलै रोजी, सायंकाळी ६ वाजता. साई ज्योती पब्लिकेशन तर्फे एम्प्रेस मिल परिसरातील नक्षत्र बँक्वेट हॉल येथे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे महसूलमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘अर्जिंक्य योद्धा’ हा ग्रंथ केवळ चरित्रग्रंथ नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनातील संघर्ष, ध्येयनिष्ठा, संघटन कौशल्य, प्रभावी नेतृत्व, लोकाभिमुख प्रशासन आणि विकासाभिमुख राजकारणाचा अभ्यासपूर्ण व संदर्भाधारित दस्तावेज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या ग्रंथामध्ये फडणवीस कुटुंबाचा ऐतिहासिक वारसा, बालपण, विद्यार्थी जीवन, नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक व महापौर म्हणून केलेले कार्य, आमदार म्हणून उभारलेली जन आंदोलने, मुख्यमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, राबविलेल्या विकासकामांचा आढावा तसेच त्यांच्या नेतृत्वाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवास संशोधनाच्या आधारे मांडण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित ‘अजिंक्य योद्धा’ या पुस्तकाचे लेखक प्रा. अरुण कणेर, जेष्ठ पत्रकार अविनाश पाठक, प्रकाशक गणेश राऊत, डॉ अमित सिंगरु, राहुल दुम्पलवार, श्री विरसिंगजी, सचिन दुम्पलवार उपस्थित होते.








