– आयुक्तांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या सूचना: नेहरूनगर झोनचा आढावा
नागपूर :- नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाच्या संदर्भात नगरसेवकांसोबत मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि झोन सभापती सीमा ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बैठकीत पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना नगरसेवकांनी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते संजय महाकालकर, जलप्रदाय समिती सभापती दिव्या धुरडे, एमआयएमचे गटनेते शकील पटेल, ज्येष्ठ नगरसेवक विजय झलके, जितेंद्र (बंटी) कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ.विपीन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगानंथम एम, मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, राजेश भगत, झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले , मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, श्रीकांत वाईकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत नगरसेवकांनी प्रभागातील नियमित स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, मच्छरांसाठी धूर फवारणी, सिव्हर लाईन चोकेज, विहिरींची स्वच्छता, घराघरातून गोळा करणार येणारा कचरा, आदी समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मागणी केली. त्यांनी सांगीतले की, स्वच्छता कर्मचारी आपल्या कामावर उपस्थित नसतात. तसेच झोन मध्ये ४४३ स्वच्छता कर्मचारी असून, केवळ काही कर्मचारीच कामावर हजर राहतात. या गैरहजर कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांनी चोकेजची समस्या सोडविण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. झोन सभापती सीमा ढोमणे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणवेश मध्ये उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगत जर कर्मचारी गणवेश मध्ये उपस्थित राहणार नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. त्यांनी झोनमध्ये खड्ड्यांचे निर्मूलन करण्यासाठी जेट पॅचर मशीनची मागणी केली. आयुक्तांनी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रभाग निहाय यादी देण्याचे निर्देश दिले.
विरोधी पक्ष नेते संजय महाकालकर यांनी सायंकाळी सहा वाजेनंतर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी पावसाळी नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली. तसेच शकील पटेल यांनी ताजबाग परिसराचा मुद्दा मांडला आणि करंट लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा विषय उपस्थित केला. दिव्या धुरडे, विजय (पिंटू) झलके, बंटी कुकडे, निलेश गायधने, प्रवीण गिऱ्हे, शुभम मोटघरे, शारदा बारई, तसनीम परवीन ताजी यांनी आपल्या क्षेत्रातील महत्त्वाचे विषय मांडले.
कर संकलनासाठी १० जुलैपासून विशेष मोहीम
आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, महसूल वाढविण्याकरिता मनपातर्फे जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी १० जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना मनपातर्फे सुविधा मिळणार नाही. वाणिज्यिक वापर असलेल्या मालमत्तेकरिता मालमत्ता कर थकीत रक्कम वसूल करण्याकरिता वस्तू व सेवा कर विभागाकडून संबधितांचे बँक खाते क्रमांक प्राप्त करून बँक खाते गोठविल्या सुद्धा जाऊ शकतील. तसेच मालमत्ता कर वसुली करण्यासाठी बिल वाटण्याकरिता महिला बचत गटांना नियुक्त करण्यात येईल असेही आयुक्त यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी महसूल वाढीच्या संदर्भात आयुक्तांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत सर्वप्रथम आयुक्तांनी झोनचा विभाग निहाय आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांनी नियमित सफाईचा अभाव गटर लाइन चौकेज, कर्मचाऱ्यांची कमतरता आधी समस्यांवर लक्ष वेधले. तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात दररोज नियमितपणे कचरा संकलन वाहने घरोघरी यावीत. आवश्यक त्या ठिकाणी यंत्रसामग्री वाढवावी. आवश्यक त्या ठिकाणीचे अतिक्रमण काढावे आदी सूचना दिल्या.
यावर नगरसेवकांचे प्रश्नांचे उत्तर देताना आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, सफाईचे काम न करणाऱ्या सफाई कर्मचारी यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मनपाच्या उपद्रव शोध पथकात मनुष्यबळ वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत २ योजना अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी केलेले खोदकाम पुन्हा तसेच करून द्यावे, अशुद्धपाणी येत असलेल्या ठिकाणी त्वरित उपाययोजना करावी. नागरिकांनी घरातील कचरा व इतर वस्तू नदी नाल्यात न टाकण्यासाठी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसह मिळून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले.




