– पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणात अनियमिततेचा आरोप
– लाभार्थी यादी रद्द करून नव्याने सर्वेक्षणाची मागणी
कन्हान :- कन्हान हॉकर युनियन व कन्हान हॉकर कृती समितीने नगरपरिषद कन्हान-पिपरीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. तसेच २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली १४९ लाभार्थ्यांची प्राथमिक यादी तात्काळ रद्द करून कायदेशीर, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार नगरपरिषदेने २० मे २०२६ ला जाहीर केलेल्या सूचनेनुसार ३ जून ते १७ जून कालाव धीत पथविक्रेत्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात आले. त्या नंतर २५ जून रोजी १४९ लाभार्थ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीच्या पडताळणी त अनेक त्रुटी आढळल्याचा दावा हॉकर युनियनने केला आहे. यामध्ये यापूर्वी नोंदणीकृत असलेल्या ३२३ लाभार्थ्यांपैकी केवळ १४९ जणांची निवड करण्यात आल्याचा अनेक प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या पथविक्रे त्यांची नावे वगळण्यात आल्याचा तसेच काही कायम स्वरूपी दुकानदार व इतर व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता सर्वेक्षण करण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. हॉकर युनियनने पथ विक्रेते (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रेते विनियमन) अधिनियम २०१४, महाराष्ट्र पथविक्रेता नियम २०१६ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा संदर्भ देत सर्वेक्षण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे.
युनियनने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.
१) २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेली १४९ लाभा र्थ्यांची यादी त्वरित स्थगित करून रद्द करण्यात यावी.
२) संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
३) दोषी अधिकारी व सर्वेक्षण पथका विरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी.
४) सर्व पात्र पथविक्रेत्यांना हरकती दाखल करण्याची संधी देऊन अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी.
५) अर्जावर कायद्यानुसार कारणासह लेखी निर्णय देण्यात यावा.
या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी, प्रादेशिक संचालक (नगरपरिषद प्रशासन), महाराष्ट्र लोकायुक्त तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाद मागण्याचा इशाराही कन्हान हॉकर युनियन व कन्हान हॉकर कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना चिराल वैध, प्रकाश सिंह, कृष्णा मोहबे, नुसरत परवेज, प्रदीप गायकवाड, इंदिरा वाल्दे, सरोज बुंदेलिया, वनिता बुंदेलिया, प्रतिभा हारगुडे, रुख्माबाई रोडेकर, आशा सुरेश धोंगडे, ममता रोडेकर तसेच कन्हान हॉकर्स युनियन कृती समितीचे सदस्य बहु संख्येने उपस्थित होते.




