नागपूर :- ज्या महानाट्याच्या निर्मितीने नागपूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला त्या ‘महासूर्य’ या महानाट्याचा अत्यंत दिमाखदार प्रयोग 25 वर्षांनी नागपुरात सादर झाला.प्रेक्षकांनी खचून भरलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात हा प्रयोग सादर करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अप्पर आयुक्त आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधवी खोंडे, माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, वनराईचे सचिव निलेश खांडेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ. संजय रामटेके, महासूर्यचे लेखक-दिग्दर्शक डॉ. सुनील रामटेके उपस्थित होते. सम्यक चे संयोजक नरेश साखरे यांनी आयोजनामागील भूमिका विशद करून सम्यक थिएटर च्या रौप्य महोत्सवी वर्षा निमीत्त महानाट्याचे प्रयोजकत्व स्विकारून भरघोस सहयोग देणारे मान्यवराचे आभार मानले तसेच डॅा. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ॲारनायझेशनच्या समस्त पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले. डॉ.सुरेश चवरे, पी.एस.कुमार, लिलेश्वर जवादे,डॅा सुचित बागडे, श्रीकृष्ण ढोले, सुखदेव सोनडवले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. निवेदन अशोक जांभुळकर यांनी केले. दीर्घ काळानंतर महासूर्य या कलाकृतीचे सादरीकरण झाले त्यामुळे रसिकांनीही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महासूर्य हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पहिले महानाट्य असुन मंत्रमुग्ध रसिकांनी या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात सादर करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या महानाट्यत डॅा. बाबासाहेबांच्या जीवनातील ठळक घटनांवर प्रकाश झोत टाकण्यात आलेला असून अत्यंत कलात्मक रीतीने त्याचे सादरीकरण केले आहे. ऐतिहासिक आणि वैचारिक आशय असूनही अत्यंत भावस्पर्शी प्रसंगांमुळे आणि करुणामय प्रसंगांमुळे या कलाकृतीचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका विनोद राऊत यांनी अत्यंत सुरेख रेखाटली असून रमाईच्या भूमिकेत मंजू नागदेवते यांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. दिग्दर्शन सहाय्य विलास कुबडे व अशोक गवळी यांचे तर नृत्य दिग्दर्शन अनुप सनकाळे यांचे होते . प्रकाश योजना शिवशंकर माळोदे यांची तर ध्वनी व्यवस्था मनीष उजवणे यांनी सांभाळली. रंगभूषा बाबा खिरेकर यांची होती. नाटकात प्रमोद भुसारी, मुकुंद वसुले, रवी पाटील, सारनाथ रामटेके, भास्कर मेश्राम, हेमंत शिंगोडे, मिलींद रामटेके, नितीन पात्रीकर, शिवांगीनी कठाणे, श्रद्धा तेलंग, वर्षा मानकर,अजय बोरकर,अतुल भुसारी, भुषण डोंगरे, मनोज वासनिक, अक्षय भगत, अमित नितनवरे, कल्याणी फुलसुंगे भिमराव खांडेकर, मनीषा सोनटक्के, मालती वराडे, रेखा ताडुरवर पुनम गायकवाड तसेच बाल कलाकारसह आदींनी सुरेखभूमिका वठवल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम,नॅार्थ नागपूर महिला फोरम तसेच युवा ग्रॅज्युएट फोरम च्या टिमने मोलाचे सहकार्य केले.




