अमरावती :- अमरावती तहसील येथे नामदार चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल व पालकमंत्री यांचे आदेशानुसार आयोजित “महाराजस्व अभियान” अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती व आमदार रवी राणा यांचे पुढाकाराने अमरावती तहसील येथे करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये बडनेरा मतदारसंघातील नागरिकांना विविध शासकीय व निमशासकीय अशा एकूण २७ योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्र्यांना आमदार रवी राणा कडून निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांना पूर्वतयारी, विभागनिहाय नियोजन तसेच लाभार्थ्यांची अद्ययावत यादी आमदार रवी राणा यांच्या अवलोकनासाठी त्यांचे खाजगी सचिव उमेश ढोणे यांचे कडे देण्याचे तसेच नायब तहसीलदार व शिबिर समन्वयक डॉ. गाडेकर यांच्याकडे जमा करणे, नोंद करणे बंधनकारक राहील.
शिबिरामध्ये विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, यामध्ये पीआर कार्ड, सनद, घरकुल मंजुरी, ‘लेक लाडकी’ योजना, कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरी मंजुरी, संजय गांधी योजना, तसेच इतर शासकीय प्रमाणपत्रांचा समावेश आहे. या बाबत काल दि.२५/०४/२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उमेश ढोणे यांनी माहिती दिली.
सर्व संबंधित यंत्रणा अधिकाऱ्यांनी शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, व शिबिर यशस्वी करावे असे आवाहन आ.रवी राणा यांनी लेखी पाठवलेल्या पत्रातून करण्यात आले आहे.

