spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराजस्व समाधान शिबीर’ हा जनसेवेचा उपक्रम – पालकमंत्री संजय राठोड

– येथील ‘महाराजस्व समाधान शिबिरा’तून ७ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लाभांचे वितरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप 

–  दारव्हा-दिग्रस-नेर परिसरातील नागरिकांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जाधव कॉटन इंडस्ट्रीज, दारव्हा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.

हा शिबीर उपविभाग अधिकारी कार्यालय दारव्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या शिबीराच्या माध्यमातून महसूलसह २२ शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारून एकाच दिवशी सुमारे ७ हजारापेक्षा जास्त नागरिकांना शासकीय लाभांचे आणि उपकरणांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, व्यसनमुक्ती प्रबोधनकार मधुकर खोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, दारव्हा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील चिरडे, श्रीधर मोहोड, भाऊराव ढवळे, यशवंत पवार, संतोष चव्हाण, दत्ता रहाणे, नेरच्या उपनगराध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय सेवा आता नागरिकांचा कायदेशीर अधिकार

उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम’ आणून नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देणे अधिकाऱ्यांवर बंधनकारक केले आहे. पूर्वीप्रमाणे सेवा देणे ही जबाबदारी होती, मात्र आता हा कायदा झाला आहे. आता सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना निर्धारित वेळेत सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामाध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे,”असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्ती आणि ‘लाडकी बहीण’ योजनांसाठी शिबीर

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक ती कागदपत्रे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतील, त्यांच्यासाठी पालकमंत्री, खासदार आणि लोकप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी लवकरच विशेष कार्यक्रम/ शिबिरे घेऊन अडचणी दूर केल्या जाईल. यासोबतच लाडकी बहीण योजनेतील वंचित राहिलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

नागरिकांच्या अर्जांवर कालबद्ध कार्यवाहीचे निर्देश

शिबिरात निकाली न निघालेल्या सर्व अर्जांवर आणि निवेदनांवर ८ ते १० दिवसांच्या आत कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी खासदार संजय देशमुख यांनीही मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतूक केले तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांना अभिवादन करण्यात आले. या महाराजस्व समाधान शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारून नागरिकांना एकच छताखाली विविध सेवा देण्यात आल्या. शिबिरादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Popular Articles