spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘स्मार्ट अंगणवाडी’ योजनेत महाराष्ट्र देशात अग्रणी

– राज्यात 24,700 हून अधिक स्मार्ट किटचे वितरण

– महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- ‘स्मार्ट अंगणवाडी’ ही अभिनव योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अग्रणी ठरला आहे. आतापर्यंत राज्यातील 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किटचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ, प्रसाद लाड, राजेश राठोड, अमोल मिटकरी, ज. मो. अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात आतापर्यंत 24,700 हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून राज्यात एकूण 1.10 लाखांपेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत. दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले असून त्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. स्मार्ट किट देताना संबंधित अंगणवाडीची इमारत ही शासनाच्या स्वमालकीची असणे बंधनकारक आहे.

स्मार्ट किटसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दरवर्षी दिले जातात. शासनाच्या आर्थिक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते, असे त्यांनी सांगितले.

पालघरमधील अंगणवाड्या हस्तांतरण प्रकरणे प्रलंबित असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील. नवीन अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजनच्या 3% राखीव निधीतून प्राधान्याने तरतूद केली जाईल. टीएचआर (टेक होम रेशन) संदर्भातील सूचनांनुसार केंद्र शासनाकडे बदलांसाठी विनंती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींच्या अभिप्रायानुसार सुधारित निकषांनुसार आहार पुरवला जाईल. नवीन शिक्षण धोरणानुसार शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Popular Articles