– कमी खर्चातील शेती, ठिबक सिंचन, मल्चिंग व रब्बी पीक नियोजनाबाबत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कामठी :- शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जमिनीचे आरोग्य जपत शाश्वत शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने कामठी तालुक्यातील मौजा गादा ग्रामपंचायत येथे कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात आले. यावेळी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेती, पाणी बचत, रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर इन्स्टिट्यूट, नागपूरचे डॉ. उल्हास गलकाटे आणि कृषी विज्ञान केंद्र, सीआयसीआर, नागपूरचे डॉ. सचिन वानखेडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच कृषी विभाग व आत्माचे कामठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एम. एन. नासरे आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन. जांभूळकर यांची उपस्थिती होती. गादा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे याबाबत मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून शेती अधिक किफायतशीर बनविण्याची गरज त्यांनी सांगितली. जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी योग्य कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे असल्याने कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. ठिबक सिंचनाचा वापर, मल्चिंग आणि आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याची नासाडी टाळून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
रब्बी हंगामात जमिनीचा प्रकार, उपलब्ध पाणी आणि स्थानिक परिस्थितीनुसार पीक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. रब्बी ज्वारी व चारा पिकांची लागवड, तसेच रब्बी पिके आणि फळपिकांच्या विम्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. पीक विम्याच्या अटी, पात्रता आणि अर्जाच्या मुदतीची माहिती कृषी विभागाकडून घेऊन पात्रतेनुसार वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गादा येथील रेश्मा चाफले आणि अजनी येथील वैशाली रामटेके या कृषी सखी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन एम. एन. नासरे यांनी केले, तर एन. जांभूळकर यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
गादा येथे आयोजित या अभियानातून जमिनीचे आरोग्य, जलसंवर्धन, कमी खर्चातील शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमिनीचे संवर्धन, पाण्याची बचत आणि शास्त्रीय पीक नियोजन ही शाश्वत शेतीची प्रमुख सूत्रे असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.








