spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

नाशिक :- महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

उद्घाटन सत्राला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद, CSRBOX चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह आणि Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या-तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नाविन्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर नाविन्यता परिसंस्था मजबूत करण्याचा राज्याचा रोडमॅप मांडला आणि नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र स्टार्टअप धोरणांतर्गत नाविन्यात सोसायटी कल्पनेपासून विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना मार्गदर्शन, संस्थात्मक भागीदारी, भांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वय यांद्वारे एकात्मिक सहाय्य प्रणाली उभारत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी रेअर अर्थ मेटल्स आणि महत्त्वपूर्ण खनिज मूल्यसाखळी यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सनी संशोधन व नाविन्यता-आधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.

डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.

नाशिकमधील ३० हून अधिक उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या गोलमेज परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूलन, पाणी व कचरा व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक प्रणाली यावर चर्चा झाली. CSR आणि नाविन्यता-आधारित हस्तक्षेपांच्या माध्यमातून कुंभला जागतिक स्तरावरील “लिव्हिंग लॅब” म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

डॉ. पाटील यांच्या हस्ते सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन लॅब अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना पारितोषिक वितरण करण्यात आले. नाविन्यता-आधारित आणि प्रभावाभिमुख उद्योजकतेला चालना देण्याची नाविन्यता सोसायटी बांधिलकी त्यांनी पुनः अधोरेखित केली.

यावेळी आयोजित प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याची दृष्टी मांडली. ग्रामीण भागातील नाविन्यता, इन्क्युबेशन नेटवर्क आणि परिणामाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी राबवत असलेल्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह तसेच प्रादेशिक स्टार्टअप संवादाच्या माध्यमातून नाशिकला नाविन्यता-आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

यावेळी नासिक-त्र्यंबकेश्वर कुंभ मेला प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.