spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वर्धा जिल्ह्यात महावितरणचा दणका: अवघ्या 15 दिवसांत 111 वीजचोऱ्या उघड

वर्धा :- जिल्ह्यात विजेचा अपव्यय रोखून वीज हानी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रामाणिक ग्राहकांना अखंडित व उच्च दर्जाचा वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 1 ते 15 सप्टेंबर या अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांत धडक कारवाई करत तब्बल 111 वीजचोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांनी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या या कारवाईमुळे अवैध मार्गाने वीज वापरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या या धडक तपासणी मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी शहरी, ग्रामीण, औद्योगिक वसाहती तसेच व्यावसायिक केंद्रांमधील वीज मीटर आणि जोडण्यांची अत्यंत सखोल पाहणी केली. या कारवाईत वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागात 38, आर्वी विभागात 33 आणि हिंगणघाट विभागात 40 अशा एकूण 111 वीजचो-या उघडकीस आल्या.

या तपासणी दरम्यान मुख्य विद्युत वाहिनीवर थेट हुक टाकून वीज घेणे, मीटर बायपास करणे, सीलशी छेडछाड करणे, मीटर संथ करणे किंवा डिजिटल डिस्प्ले बायपास करणे यांसारखे बेकायदेशीर प्रकार निष्पन्न झाले आहेत. या मोहिमेत घरगुती वापरासोबतच काही व्यावसायिक संस्था आणि लहान उद्योगांमधील गैरप्रकारही समोर आले आहेत.

उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये चोरीच्या विजेचे अचूक मूल्यमापन करून दंडात्मक रकमेची बिले (Assessment) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी आढळलेल्या ग्राहकांवर भारतीय वीज कायदा, 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये कडक फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात येत असून अनेक ठिकाणी तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या 111 वीज चो-यांव्यतिरिक्त मंजूर कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वीजेचा वापर केल्याचे भारतीय वीज कायदा, 2003 च्या कलम 126 अन्वये हिंगणघाट विभागात 1 प्रकरण उघडकीस आले आहे.

वीजचोरीमुळे केवळ महावितरणची आर्थिक हानी होत नसून, रोहित्रांवर अतिरिक्त ताण येऊन ते जळणे, तांत्रिक बिघाड होणे आणि नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना कमी दाबाच्या विजेचा त्रास सहन करावा लागणे असे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि दर्जेदार वीज सेवेसाठी ही शोधमोहीम आगामी काळात अधिक वेगाने राबवली जाईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे.

नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अधिकृत वीज जोडणी घेऊनच सुरक्षित वीज वापरावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. तसेच परिसरात वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी महावितरणला सहकार्य करून माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी ग्वाहीही प्रशासनाने दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.