Home Latest News रासेयोतून निर्माण झालेला सेवाभाव जीवनात कायम ठेवा – कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी...

रासेयोतून निर्माण झालेला सेवाभाव जीवनात कायम ठेवा – कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांचे आवाहन

0
60

– रासेयोचा विद्यापीठ स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

नागपूर :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला सेवाभाव सत्कारापर्यंत मर्यादित न राहता आयुष्यामध्ये कायम ठेवा, असे आवाहन कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी महाराज बाग चौक येथील दीक्षांत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात उत्कृष्ट स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी, प्राचार्य आणि महाविद्यालयांचा पुरस्कार देत गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरू मार्गदर्शन करीत होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती. रासेयो स्वयंसेवक हा विद्यापीठाचा दूत असून समाजातील अन्य घटकांना आपल्या सेवाभाव कार्याच्या माध्यमातून प्रेरित करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्कारीत पिढी अर्थात नागरिक घडवित आहोत, असे कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे पुढे बोलताना म्हणाल्या. तरुणांच्या मनामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा याकरिता २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली.

समाज, देश, स्वतः सोबतच संपूर्ण विश्वाला सेवाभावाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेणारे आपण आदर्श आहात. पुरस्कार प्राप्त प्रत्येकजण इतरांसाठी आदर्श असल्याचे कुलगुरू म्हणाल्या. रासेयो सेवाभावनेतून मानवता व सर्वधर्मसमभावाची शिकवण देते. कोरोना काळात स्वयंस्वयंसेवकांनी जात, धर्म, पंथ सर्व बाजूला ठेवत मानवतेच्या दृष्टीने कार्य केले. विद्यापीठ गीतातील महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे प्रत्येक तरुण उद्योगी, वीर तसेच शीलवान व्हावा असे कुलगुरू म्हणाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी रासेयोच्या ब्रीद वाक्याप्रमाणे स्वतःमध्ये त्यागाची भावना निर्माण करण्याचे आवाहन केले. इतरांसाठी त्याग करायला हवे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला एकात्मतेचा भाव समजून सांगावा, असे ते म्हणाले. ग्रामीण भागात स्वच्छता तसेच विकासाच्या विविध योजनांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सतत मदतीच्या भावनेतून कार्यरत असतो. त्यागाची भावना ठेवून ग्रामीण भागात कार्यक्रम राबवून मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे विद्यार्थी मोबाईल ॲप सर्व विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करीत विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच शासनाने निर्माण केलेल्या स्वयंसिद्धा या पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विविध पुरस्कारांची माहिती संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी दिली. त्याचप्रमाणे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला, असे त्यांनी सांगितले. या सोबतच पथसंचलनाकरिता राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणी शिबिराचा मान विद्यापीठाला मिळाला असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी प्राची वानखेडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बनकर, प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव येथील श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुणकर चितलांगे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पांडुरंग डांगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तत्पूर्वी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार  प्रकाश शुक्ला यांनी मानले.

उत्कृष्ट पुरस्कारांचे वितरण

उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार हिस्लाॅप महाविद्यालयाचा चिराग दीपक शुक्ला, बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा कळमेश्वर येथील श्री ओमकेश्वर रामेश्वर निंबाळकर, एलएडी वुमेन महाविद्यालय सेमिनरी हिल्स नागपूर येथील ग्रीष्मा खराबे, रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय भोखारा येथील प्राची महेंद्रा वानखेडे, अशोक मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पामेला भंडारा येथील मनीष मुकेश जगनाडे, गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर भंडारा येथील आकांक्षा रमेश सांगोले, नटवरलाल माणिकलाल दलाल कला व वाणिज्य महाविद्यालय गोंदिया येथील विनय हंसराज मेंढे, शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव गोंदिया येथील स्नेहल संजय ब्राह्मणकर, बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील गुरुप्रसाद मोहनराव साटोणे यांचा पुरस्कार देत सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील डॉ. अनिल बनकर, डॉ. एस. सी. गुल्हाने प्रेरणा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील डॉ. मंजिरी दत्तात्रय पाठक, नबीरा महाविद्यालय काटोल येथील प्रा. अमितकुमार खांडेकर, श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर लाखनी भंडारा येथील डॉ. संजयकुमार निंबेकर, गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर भंडारा येथील डॉ. मुबारक कुरेशी, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील डॉ. आशिष चरणदास कावळे यांचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर, डॉ. एस. सी. गुल्हाने प्रेरणा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर, नबीरा महाविद्यालय काटोल, श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर लाखनी भंडारा, गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर भंडारा, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांचा सत्कार करण्यात आला.