मुंबई २८ : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मोर्चासाठी फक्त एका दिवसाची परवानगी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, सध्या भरपावसात मुंबईच्या दिशेने निघालेले तरुण मोटरसायकलवरून प्रवास करत आहेत, हा त्यांचा हट्ट नसून मराठा समाजाच्या वेदना आहेत. फडणवीस यांनी या वेदनांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जरांगे पाटील म्हणाले, “मला आशा आहे की देवेंद्र फडणवीस कुणालाही थांबवणार नाहीत आणि गोरगरीब मराठा लेकरांच्या वेदनांचा सन्मान करतील.”
मुंबईतील आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जरी न्यायालयाने सांगितल्यामुळे परवानगी द्यावी लागली असली तरी, आंदोलनाला परवानगी देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या हातात होता. एका दिवसाची परवानगी देणे ही मराठा समाजाची चेष्टा आहे. यामुळे राज्यात चुकीचा संदेश गेला आहे.
‘जाणूनबुजून परवानगी नाकारल्याचा आरोप’
जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “न्यायालयाने सांगितले असले तरी, परवानग्या देण्याचा अधिकार तुमच्याकडेच होता. पण तुम्ही जाणूनबुजून समाजाला फक्त एका दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे समाजात मोठी नाराजीची लाट उसळली आहे.” त्यांनी सरकारला मराठा समाजाच्या वेदना समजून घेऊन आंदोलनासाठी पूर्ण वेळ देण्याची मागणी केली.
‘फडणवीसांनी मराठा विरोधी भूमिका सोडावी’
जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना गैरसमज दूर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “तुमची बहुमताची सत्ता मराठा समाजाशिवाय आलेली नाही. जर मराठ्यांची नाराजीची लाट आली, तर ती राजकीय करिअर बर्बाद करणारी असू शकते.” त्यांनी फडणवीसांना ही मराठा समाजाची मने जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिले, तर आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही आमचे शत्रू नाही, त्यामुळे मराठा विरोधी आणि आडमुठेपणाची भूमिका सोडा.”
‘गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही’
सरकार मराठा समाजाची चेष्टा करत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला मूर्ख बनवले जात आहे, माझा आणि समाजाचा अपमान केला जात आहे.” मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “आता गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आंदोलन आणि सरकार यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.




